अलिबाग पोलिसांकडून तपास शून्य
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील साखर आक्षी येथील एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण होऊन एक महिना पूर्ण झाला. मात्र, अजूनपर्यंत मुलीचा शोध लागत नसल्याने बापाच्या हृदयाची धडधड वाढत आहे. आपल्या लेकीच्या वाटेकडे डोळे करीत बाप मुलीला बघण्यासाठी हंबरडा फोडत आहे. आपली मुलगी भेटेल या आशेने तो पोलीस ठाण्याचा उंबरठा झिजवत आहे.
मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणार्या प्रशांत वाडे यांची अल्पवयीन मुलगी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरातून शाळेत निघाली. संध्याकाळ झाली तरी ती घरी आली नाही. त्यामुळे वाडे यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली अलिबागपासून काही अंतरावर असलेल्या एका गावातील तरुणाने तिचे अपहरण केल्याची माहिती त्यांना मिळाली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सौंदरमल यांच्याकडे सोपविण्यात आला.
आपली मुलगी लवकरात लवकर भेटावी म्हणून वाडे यांनी अनेक वेळा पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले आहेत. तहान-भूक हरपून आपल्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न ते गेल्या महिन्याभरापासून करीत आहेत. ज्या मुलाने तिचे अपहरण केले आहे, त्याच्या नातेवाईकांना भेटून त्यांना वारंवार विनंत्या करीत आहेत. माझ्या मुलीला एकदा तरी बघू दे अशी विनवणी केली जात आहे. मात्र, अजूनही काही थांगपत्ता लागत नसल्याची खंत बापाने व्यक्त केली आहे.
पंधरा वर्षांच्या शाळकरी अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. तरीसुद्धा मुलगी सापडत नसल्याने बापाला चिंता पडली आहे. आपली मुलगी कुठे आहे, काय करत असेल, काही खाल्ले असेल का, असे अनेक प्रकारचे प्रश्न बापासमोर उभे राहात आहे. आपल्या मुलीला भेटण्यासाठी बाप हंबरडा फोडत आहे. पण, त्याच्या या हंबरड्याकडे पोलिसांकडून लक्षच दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. अन्यथा मुलीसाठी पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले जाईल, असा इशारा त्याने दिला आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.