श्रीवर्धनमध्ये पथदिव्यांचा गोंधळ

उजेडातच दिवे सुरू, अंधारात बंद; नागरिकांकडून नाराजी व्यक्त

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन नगरपरिषदेने सी.आर.एस. निधीतून नुकतेच शहरात नव्याने पथदिवे बसवून त्यांचे लोकार्पण केले होते. खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता. सौरऊर्जेवर चालणारे आणि आकर्षक स्वरूपाचे हे दिवे शहराच्या सुशोभीकरणासाठी बसविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात ते अद्याप महावितरणच्या विजेवरच सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नगरपरिषदेवर वीज बिलाचा अतिरिक्त बोजा वाढत असल्याची चर्चा आहे. याशिवाय या पथदिव्यांसाठी बसवण्यात आलेली टायमर प्रणालीही चुकीची असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या सायंकाळी सुमारे सहा वाजताच दिवे सुरू होतात, मात्र त्यावेळी पुरेसा उजेड असतो. उलट, सकाळी सहा वाजता, जेव्हा पूर्ण उजाडलेले नसते आणि परिसरात अंधार असतो, तेव्हा हे दिवे बंद होतात. या त्रुटीबाबत नगरपरिषदेला वारंवार कळवूनही अद्याप कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शहरातील श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार ते समुद्रकिनारा, तसेच बागवान मशिदीपासून शासकीय विश्रामगृहाच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत या पथदिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक चौकात अधिक प्रकाशासाठी हायमॅक्स दिव्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

तथापि, पथदिवे योग्य वेळी सुरू-बंद होण्यासाठी टायमर प्रणालीत तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर दिवे सुरू व्हावेत आणि पहाटे उजाडेपर्यंत प्रकाश मिळावा, यासाठी नगरपरिषदेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Exit mobile version