विमानतळाच्या कामांमुळे वहाळ ग्रामस्थांमध्ये भीती

| उरण । वार्ताहर ।

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी दहा गावांना स्थलांतरित करण्यात आल्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामांनी वेग घेतला आहे. विमानतळाच्या आड येणार्‍या सर्वच टेकड्यांचे सपाटीकरण झाल्यानंतर आता केवळ उलवे टेकडीचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात दररोज दुपारी स्फोट घडवून टेकडी फोडण्याची कामे केली जात आहेत. मात्र या स्फोटांमुळे विमानतळ परिसराच्या शेजारी असलेल्या वहाळ गावाला हादरे बसत आहेत. गावातील तब्बल 80 घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे या स्फोटांनी घरे कोसळतील की काय, अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. तसेच, या स्फोटांमुळे राहत्या घरांचे झालेले नुकसान कोण भरून देणार, असा प्रश्‍न ग्रामस्थांनी सिडकोकडे उपस्थित केला आहे.

ग्रामस्थांनी एकत्र येऊन वहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने सिडकोकडे याबाबत तक्रार करत अशाप्रकारे होणारे स्फोट बंद करण्याची मागणी केली आहे. हे स्फोट बंद न झाल्यास विमानतळाचे काम बंद करण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.

अशा प्रकारच्या स्फोटांमुळे गावातील घरांना हादरे बसत आहेत. 80 हून अधिक घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे हे प्रकार थांबावेत म्हणून आम्ही सिडको, ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रार केली आहे. हे प्रकार न थांबल्यास काम बंद करण्यासाठी जनआंदोलन उभारून या प्रकाराला विरोध केला जाईल.

राजेंद्र पाटील
पंचायत समिती अध्यक्ष, वहाळ गाव
Exit mobile version