श्रीलंका सुद्धा अडचणीत
| लखनौ | वृत्तसंस्था |
विश्वचषकामधील 14 वा सामना आज गुणतालिकेत तळाशी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि आठव्या क्रमांकावर श्रीलंका यांच्यात होत आहे. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेची विजयी सुरुवात करायची आहे.
ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या दोन सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला आहे, तर श्रीलंकेचा संघ आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानकडून पराभूत झाला. त्यामुळे दोन्ही संघांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. गुणतालिकेत श्रीलंका आठव्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया तळाच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत या दोन संघांमध्ये दमदार सामना अपेक्षित आहे, कारण ऑस्ट्रेलियन संघ हा विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार म्हणून पुढे आला होता, तर श्रीलंकेच्या संघालाही पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पण अपेक्षेपेक्षा त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात रंगतदार सामना होण्याची अपेक्षा आहे.
लखनौमधील एकना स्टेडियमची खेळपट्टी संथ असल्याने येथे धावा काढणे अवघड आहे, परंतु गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत स्टेडियमच्या इतिहासातील सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या उभारली. त्यानंतर, ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फलंदाजी करणे फार कठीण झाले, कारण जसजसा खेळ पुढे सरकत गेला तसतशी खेळपट्टी गोलंदाजांना अधिक मदत करू लागली. त्यामुळे शेवटच्या सामन्यातील खेळपट्टी पाहिल्याने श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. कारण नंतर फलंदाजांना धावा करण्यात अडचणी येऊ शकतात. श्रीलंकेबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा कर्णधार दासुन शनाका दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे. त्याच्या जागी चमिका करुणारत्नेचा समावेश करण्यात आला आहे, जो उत्कृष्ट सीम गोलंदाज आहे आणि फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो.