| अलिबाग | प्रतिनिधी |
परहूरपाडा येथील गोळीबार मैदानात नवी मुंबई येथील पोलिसांचे गोळीबार प्रशिक्षण रविवारी सुरु होते. त्यावेळी घराच्या पत्र्याला छेद करून एक गोळी घरात घुसल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुन्हा कार्ले गाव गोळीबाराच्या दहशतीखाली असल्याचे समोर आले आहे.
परहूरपाडा या ठिकाणी गावापासून काही अंतरावर डोंगराच्या नजीक गेल्या अनेक वर्षांपासून गोळीबार प्रशिक्षण केंद्र आहे. रायगड पोलिसांसह नवी मुंबई येथील पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत गोळीबारचे प्रशिक्षण या ठिकाणी चालते. अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील अभिजीत पाटील यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर शेडखाली बसले होते. त्यावेळी त्यांना पत्र्याला छेद पडलेले दिसून आले. बंदुकीच्या गोळीने छेद पडल्याचा संशय त्यांच्यामध्ये निर्माण झाला. मात्र, ती गोळी त्यांना दिसून आली नाही. बंदुकीची गोळी या गावातील अनेक घरांच्या पत्र्यांना छेद करून गेली आहे. काही वेळेला घरातही ही गोळी गेल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारामुळे कार्ले गाव पुन्हा दहशतीखाली येऊ लागला आहे. यावर ठोस उपाय करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. मात्र, त्यावर अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
ग्रामस्थांची झोपमोड
परहूरपाडा येथे पोलीस गोळीबार प्रशिक्षण केंद्रात वेगवेगळ्या पोलिसांमार्फत गोळीबार प्रशिक्षण केले जाते. गावापासून काही अंतरावर असलेल्या या गोळीबार प्रशिक्षण केंद्राच्या काही अंतरावर नागरी वसाहत आहे. या वसाहतीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना गोळीबाराच्या आवाजाने नाहक त्रास होत आहे. पहाटेच्यावेळी होणाऱ्या गोळीबारामुळे अनेक वेळा ग्रामस्थांची झोपमोड होत असल्याचे बोलले जात आहे.
कार्ले गावात गोळी घुसण्याबाबत संशोधनाचा विषय
गोळीबारामुळे कार्ले गावातील ग्रामस्थांना त्रास होऊ नये यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेतला. गावातील ग्रामस्थ, महिला, बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलले होते. मात्र, संरक्षण भिंत बांधूनदेखील प्रशिक्षणच्यावेळी गोळी कार्ले गावात घुसत आहे. त्यामुळे हा विषय संशोधनाचा होत असल्याची चर्चा जोरात आहे.
परहूरपाडा येथे गोळीबार प्रशिक्षण सुरु आहे. त्याच्या आवाजाचा त्रास होत असताना तेथील गोळी घरांच्या पत्र्यांना छेद करून नुकसान करीत आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून त्रास होत आहे. मात्र, याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अभिजीत वार्डे, ग्रामस्थ
कार्ले गावातील अभिजीत वार्डे यांच्या घराच्या पत्र्याला छेद करून गोळी केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, गोळी सापडली नाही. परंतु, कार्ले गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशिक्षण सुरु असलेल्या पोलिसांना काळजी घेऊन गोळीबार करण्याचे पत्र देण्यात येईल.
संजय पाटील, पोलीस निरीक्षक, अलिबाग