हजारो हेक्टरवरील भाताची रोपे कुजण्याची भीती

| पेण | प्रतिनिधी |

गेली दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः पेण तालुक्याला झोडपून काढले आहे. खारेपाटासह पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. यामध्ये खारेपाटात अजून लावणीला सुरूवात झाली नसल्याने पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे भाताची रोप कुजण्याची शक्यता बळिराजा वर्तवत आहेत.

आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील खारेपाटाचा जनजीवन विस्कळीत झाला असून, पेण शहराशी शिर्की विभाग, भाल विभागाचा, घोडा बंदर विभागाचा काही काळ संपर्क तुटला होता. तर दुरशेत, बळवली या गावांसह हमरापूर विभागाचादेखील संपर्क तुटला होता. पूर्ण पेण तालुक्याचा आपत्कालीन व्यवस्था अलर्ट मोडवर असून, बारीकसारीक सर्व घटनांवर पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे लक्ष देऊन होत्या.

बाळगंगा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे जितेपासून गोविर्लेपर्यंतचा दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला असून, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नगरपालिकेने पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था योग्य प्रकारे न केल्याने उत्कर्ष नगरमधील बहुतांश घरांमध्ये पाणी शिरले असून, जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. या भागामध्ये मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्या.

पेण शहराला लागून असणाऱ्या भोगावती नदीने रुद्र रूप धारण केले असून, धोक्याची पातळी ओलांडली आहे. भोगावती नदीशेजारील बोरगाव, धावटे, गणपती वाडी, तरणखोप, अंतोरे, नवघर, पाटणेश्वर या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बोरगाव ग्रामपंचायत व अंबेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत भोगावती नदीच्या पात्रात रशाद मुजावर नामक व्यक्तीने बंधारा बांधला असून, हा बंधारा बांधत असताना अवैध भराव केल्याचे पंचनामे या अगोदरच पेण तहसील कार्यालयाने केले आहेत. त्याप्रमाणे त्याला दोषी ही ठरवले आहे. मात्र दंडात्मक कारवाई करून बंधारा काढण्याच्या सुचना देउन ही गेली दोन वर्ष हा बंधारा निघालेला नाही. तसेच दंडाची रक्कम ही भरलेली नाही. मात्र दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदिने रुद्ररुप धारण केल्याने त्यास सर्वस्वी धोका बोरगाव गावाला आहे. त्यामुळे बोरगाव ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन पाऊस कमी होण्याची वाट पाहत आहे.

Exit mobile version