पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता थेट रायगड जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. इंधनाचा तुटवडा निर्माण होईल आणि किमती गगनाला भिडतील, या भीतीने जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.
काही पेट्रोल पंपावर पेट्रोलचा साठा संपल्याचे फलक झळकल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये घबराट पसरली असून, अघोषित टंचाईचे सावट पाहायला मिळत आहे. पेट्रोल महाग होणार’ या सोशल मीडियावरील अफवा आणि जागतिक परिस्थितीमुळे नागरिकांनी इंधन भरण्यासाठी एकच गर्दी केली आहे. यामुळे पंपांवरील साठा वेगाने संपत असून, नियमित पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक नोकरदार आणि व्यावसायिक आपला दैनंदिन प्रवास कसा होणार, या काळजीत आहेत. याचा येथील जनजीवनावर परिणाम वाढत आहे. ही कृत्रिम इंधन टंचाई कायम राहिल्यास वाहतुकीचा खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. इंधन ही आजच्या काळातील मूलभूत गरज बनली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली ही धास्ती आणि त्यातून उद्भवलेली इंधन टंचाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे.
शंभर-दीडशे रुपयांच्या इंधनावर भागवायचे कसे?
इंधन टंचाईच्या धास्तीमुळे सध्या पेट्रोल पंपांवर इंधनाचा कोटा मर्यादित करण्यात आला आहे. अनेक पंपांवर दुचाकीस्वारांना केवळ 100 ते 150 रुपयांचेच पेट्रोल दिले जात आहे. प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणास्तव पुकारलेल्या या अघोषित कपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्यांना कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागतो, अशा नोकरदार आणि व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
गैरसोय व अडचणींचा सामना
या परिस्थितीवर बोलताना अमित निंबाळकर यांनी सांगितले की, काही नागरिकांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच इंधन टंचाईची चाहूल लागताच टाक्या फुल केल्या होत्या, मात्र आता ज्यांना तातडीची गरज आहे त्यांना केवळ मर्यादित पेट्रोल मिळत आहे. एवढ्याशा पेट्रोलवर दैनंदिन कामे कशी पूर्ण होणार? लांबच्या प्रवासासाठी तसेच व्यावसायिक कामासाठी हे इंधन अपुरे पडत असल्याने मोठी अडचण होत आहे. शिवाय पेट्रोल भरण्यासाठी वेगवेगळ्या पेट्रोल पंपाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे पेट्रोल ही संपते. काहीजणांनी तर प्लास्टिक बॉटल व ड्रम मध्ये भरून देखील पेट्रोल गेले.
पेट्रोल अभावी आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी खासगी वाहने मिळणे कठीण झाले असून, आपत्कालीन सेवेवर याचा मोठा परिणाम होत आहे. काही पेट्रोल पंप चालक जाणीवपूर्वक साठा असूनही विक्री करत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. शासनाने अशा नफेखोर पंप चालकांवर कडक कारवाई करावी. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इंधनाचा पुरवठा सुरळीत करावा आणि टंचाई निर्माण करणाऱ्यांवर अंकुश ठेवावा, जेणेकरून सामान्य जनतेची होणारी गैरसोय थांबेल.
योगेश सुरावकर,
नागरिक, पाली
युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेल संपेल अशी भीती नागरिकांना वाटत आहे. समाज माध्यमांवर या संदर्भात चर्चा सुरू आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर देखील तशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून लोक इंधन भरण्यासाठी गर्दी करत आहेत. यामुळे खूप ताण येत आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व गोंधळून जाऊ नये.
संदीप जाधव,
पेट्रोल पंप व्यवस्थापक, सुधागड
शहरामधील व भोवतालचे बहुसंख्य पेट्रोल पंप बंद होते. एका ठिकाणी पेट्रोल पंप सुरू होता. तिथे प्रचंड प्रमाणात गर्दी होती. रांगेत उभे राहून गर्दीचा सामना करत पेट्रोल भरून घेतले. पेट्रोलचा तुटवडा होत चालल्यामुळे लोकांची खूप गैरसोय होताना दिसत आहे.
निरंजन सुर्वे,
नागरिक, पेण
