| पेण | प्रतिनिधी |
जिते परिसरातील नागरिकांसाठी दि.6 जुलैची पहाट अक्षरशः काळरात्र ठरली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर अचानक ढगफुटीसदृश पावसाने परिसराला झोडपून काढले. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा भीषण परिस्थितीत प्रसंगावधान राखत रेल्वेचा संभाव्य मोठा अपघात टाळणारे प्रसाद पाटील यांच्या कार्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने दि. 15 ऑगस्ट रोजी त्यांचा विशेष सत्कार केला.
जिते येथील प्रसाद पाटील यांना दि.6 जुलै रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांच्या मित्राच्या घरात पाणी शिरल्याचा फोन आला. परिस्थिती पाहण्यासाठी ते तातडीने मित्रासोबत बाहेर पडले. मात्र, खरोशी फाटा ते चुनाभट्टीदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट पाणी साचल्याने पुढे जाणे शक्य झाले नाही. त्यानंतर गावातील परिस्थितीचा आढावा घेत असताना त्यांचे लक्ष रेल्वे मार्गाकडे गेले. रेल्वे रुळाजवळ जाऊन पाहिले असता पावसाच्या पाण्यामुळे रुळाखालील माती व खडी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तब्बल 20 मीटरपर्यंत रेल्वे रुळ हवेत लटकलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मित्रासह जिते रेल्वे स्थानक गाठले. स्टेशन प्रशासनाला प्रत्यक्ष माहिती देतानाच त्यांनी घटनास्थळाचा व्हिडिओही दाखवला. प्रसाद पाटील यांनी दिलेल्या या माहितीची तातडीने दखल घेत रेल्वे प्रशासनाने पुढील कार्यवाही केली आणि त्या मार्गावरून येणाऱ्या गाड्यांना धोका होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेतली. विशेष म्हणजे, काही दिवसांनी त्यांना रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळाली की, घटना घडलेल्या ठिकाणाहून अवघ्या अर्ध्या तासाने वंदे भारत एक्स्प्रेस जाणार होती. त्यामुळे प्रसाद पाटील यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे स्पष्ट झाले.







