यशवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप

पीएनपीच्या गुणवंतांचा आ. जयंत पाटील, चित्रलेखा पाटील यांच्याकडून गौरव
। अलिबाग । प्रतिनिधी ।

दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये पीएनपी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाची पोचपावती म्हणून नुकताच कौतुक सोहळा पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी संस्थेतर्फे सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या आर्ट्स, कॉमर्स व सायन्स बारावीचा निकाल 99.82 टक्के लागला असून, संस्थेमधून अथर्व म्हात्रे 90.50 टक्के गुण मिळवून प्रथम आला. आर्ट्समध्ये हिर जैन 80.17 टक्के गुण मिळवून प्रथम, तर कॉमर्समध्ये संस्कृती पाटील 79.50 टक्के गुण मिळवून प्रथम आली.


दरम्यान, दहावीमध्येसुद्धा पीएनपीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. यामध्ये पीएनपी होली चाईल्ड इंग्लीश मिडीअम स्कूल वेश्‍वीची विद्यार्थिनी सिया राजेश अग्रवाल 95 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम आली. माध्यमिक शाळा मोठी जुई उरण विद्यार्थिनी मानसी जितेंद्र पाटील 93.80 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर माध्यमिक शाळा मोठी जुई उरणची विद्यार्थिनी स्नेहा किशोर भोईर 93 टक्के गुण मिळवून तृतीय आलेली आहे. याप्रसंगी पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, मुख्याध्यापक निलेश मगर, मुख्याध्यापक किशोर भोईर, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version