75 लघुउद्योगिनींचा घरी जाऊन सन्मान
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या मा. नगरसेविका डॉ. सुरेखा विलास मोहोकर यांच्या संकल्पनेतून माजी आ. बाळाराम पाटील तसेच माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते पनवेलमधील लघुउद्योगिनींचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांच्या पाठीवर शेकापने नेहमीच शाबासकीची थाप दिली आहे. या उद्देशातून जागतिक महिला दिनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 75 महिलांचा प्रातिनिधीक सन्मान शेकापकडून करण्यात आला.

स्त्रियांमधील क्षमता कौटुंबिक जीवन आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यासाठी मदत करते. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून आपल्यातील कला जोपासत स्त्री आपल्या कृतीतून स्वतःचा आत्मविश्वास वाढवित आहे. अशा प्रकारे आजची स्त्री खर्या अर्थाने सखी, सहचारिणी आणि सक्षम बनत आहे. आपल्यातील कला जोपासत काही स्त्रिया आपले कुटुंब सांभाळत छोटे छोटे उद्योग करीत असतात. कोणी पोळीभाजी बनविते, डबे देते, कोणी ब्युटी पार्लर, हातांनी बनवलेल्या वस्तू विक्रेते, ट्युशन घेणे, अगरबती साबण बनविणे, नृत्य शिकवणे, संस्कार वर्ग चालविणे, साडीला पिको करणे, शिवण काम करणे, इन्शुरन्स ची कामे, फुलांचे हार बनविणे, एक ना अनेक लघु उद्योग महिला आपल्या घरातून करीत असतात. अशा स्त्रियांच्या कर्तृत्वावर शाब्बासकीची थाप देण्याकरिता माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांनी महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या कार्याचा सन्मान सन्मानचिन्ह देऊन केला व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या तीन दिवस चालणार्या कार्यक्रमात माजी आमदार बाळाराम पाटील तसेच माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी उपस्थित राहून आपल्या हस्ते लघुउद्योगीनींचा सन्मान केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात 75 लघुउद्योगिनींचा सन्मान सोहळा या छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला. या सन्मानाने माता भगिनी भाऊक झाल्या व त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना शाबासकीची थाप देण्याकरिता घरी आल्यामुळे त्यांनी माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांचे आभार मानले. सदरच्या कार्यक्रमास डॉ. बीरमोले, देसाई काका-काकू उपस्थित राहिले. मनीषा परदेशी व वैशाली शाह यांनी याकरिता मोलाचे योगदान दिले.