। पनवेल । प्रतिनिधी ।
भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक बसून दुचाकीस्वार महिला ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळोजा फेज-1 येथील नावडे उड्डाणपुलावर घडली. या अपघातप्रकरणी तळोजा पोलिसांनी ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. जास्मिन नावीद अंसारी (47) असे मृत महिलेचे नाव असून, त्या मालाड येथील मालवणी परिसरात राहत होत्या. त्यांची बहीण तळोजा येथे राहत असल्याने जास्मिन या आपल्या बहिणीकडे आल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांनी अपघाताच्या अवघ्या आठ दिवसांपूर्वीच दुचाकी खरेदी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जास्मिन या आपल्या दुचाकीवरून तळोजा फेज-1 येथून पनवेलच्या दिशेने जात होत्या. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नावडे येथील उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रेलरने धडक दिली. धडकेनंतर जास्मिन या रस्त्यावर पडून ट्रेलरच्या मधल्या चाकाखाली आल्या. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तळोजा पोलिसांनी ट्रेलरचालक युसुफ मोहम्मद अश्रफ (27) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
