| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 7 आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी शनिवारी (दि.7) सकाळपासून 261 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. यावेळी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 1 लाख 21 हजार 857 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 60.35 टक्के मतदान झाले. त्यात 60 हजार 900 पुरुष आणि 60 हजार 957 महिला मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे मतदान करण्यामध्ये पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले.
अलिबाग तालुक्यामध्ये शहापूर, आंबेपूर, आवास, थळ, चेंढरे, चौल व कावीर असे 7 जिल्हा परिषद गट, तसेच वैजाळी, शहापूर, आंबेपूर, रुईशेत भोमोली, आवास, किहीम, थळ, वरसोली, चेंढरे, आक्षी, रेवदंडा, चौल, काविर व रामराज असे 14 पंचायत समिती गण आहेत. या निवडणुकीत 2 लाख 1 हजार 923 मतदारांचा समावेश आहे. त्यामध्ये 98 हजार 806 पुरुष व 1 लाख 3 हजार 17 महिला मतदार आहेत. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात एकूण 63 उमेदवार आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे 21 आणि पंचायत समितीचे 42 उमेदवार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून 261 मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. काही मतदान केंद्रामध्ये सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, बामणगाव, सहाण, रामराज इत्यादी मतदार संघात चांगला प्रतिसाद दिसून आला. यावेळी मतदार स्वयंस्फुर्तीने घराच्या बाहेर पडून मतदान करण्यासाठी मतदान केंद्राकडे वळले होते. या निमित्ताने एक वेगळा उत्साह मतदारांमध्ये पहावयास मिळाला.
आदिवासीवाड्यांमधील मतदारांनीदेखील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. सकाळी साडेआठ नंतर तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगच रांग दिसून आली. साडेनऊ वाजेपर्यंत अलिबाग तालुक्यात 12.43 टक्के झाले. त्यावेळी 25 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर सकाळी दीड वाजेपर्यंत मतदानासाठी रांगच रांग होती. कामार्ले येथील किरकोळ वाद वगळता तसेच सहाण येथील मतदान केंद्रातील बिघाडाची परिस्थिती पहाता, तालुक्यात मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडली. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तालुक्यामध्ये 57 हजार 867 (28.66 टक्के) मतदारांनी मतदान केले. त्यात 29 हजार 959 पुरुष आणि 27 हजार 908 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दीड वाजेपर्यंत 93 हजार 49 (46.8 टक्के) मतदारांनी मतदान केले. दुपारपर्यंत मतदानाच्या टक्क्यात भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे हा आकडा दुपटीने वाढल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 2 लाख 1 हजार 923 मतदारांपैकी 1 लाख 21 हजार 857 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 60.35 टक्के मतदान झाले. त्यात 60 हजार 900 पुरुष आणि 60 हजार 957 महिला मतदारांचा समावेश होता. त्यामुळे या कालावधीत पुरुषांपेक्षा महिला मतदानासाठी आघाडीवर अल्याचे दिसून आले.
मतदानावर दृष्टीक्षेप
| वेळ | टक्के | पुरुष | महिला | एकूण केलेले मतदान |
| 7.30 ते 09.30 | 12.43 | 13,894 | 11,210 | 25,104 |
| 09.30 ते 11.30 | 28.66 | 29,959 | 27,908 | 57,867 |
| 11.30 ते 1.30 | 46.08 | 46,567 | 46,482 | 93,049 |
| 1.30 ते 3.30 | 60.35 | 60,900 | 60,957 | 1,21,857 |











