भाकरीपाडा येथे वहिवाटीच्या रस्त्याला कुंपण

। नेरळ । वार्ताहर ।
स्थानिक ग्रामस्थांचा पूर्वीपार वहिवाट असलेला रस्त्याच्या तेथील जमीन मालक यांनी कुंपण करण्यास सुरुवात केल्याने स्थानिकांचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे स्थानिक भाकरीपाडा येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यात येत असलेला कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु, आता कर्जत तालुका हा पर्यटनदृष्ट्या विकसित होत असून, मुंबईतील बिल्डर, व्यावसायिक यांनी येथे जमिनी खरेदी केल्या आहेत. कर्जत तालुक्यातील भाकरीपाडा येथील शेतकर्‍यांच्या शेतावर पूर्वीपासूनची जाण्यासाठी असलेली वहिवाटीचा मार्ग जमीन मालकाने कुंपण केल्याने बंद झाला आहे. पिंपळोली ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या भाकरीचापाडा पूर्वीपार असलेला शेतकर्‍याचा रस्ता आणि आदिवासी लोक वस्तीला जोडणार्‍या वहिवाटीच्या रस्त्यावरच येथील बिल्डराने रस्ता अडवून कुंपण घालून ग्रामस्थांचा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत, तर या ग्रामस्थांनी न्यायासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला आहे.


आपला वहिवाट असलेला रस्ता त्या जागेतून मिळावा म्हणून स्थानिक रहिवासी राम क्षीरसागर यांनी कर्जत तहसीलदार कार्यालयात रस्त्याच्या मागणीसाठी अर्ज केला आहे. मात्र, तहसील कार्यालयाने हा अर्ज जमीन मालकाच्या बाजूने निकाली काढला आहे. त्यामुळे जमीन मालकाने सदर जमीनीत कुंपण घालण्यास सुरुवात केली आहे.परिणामी ग्रामस्थांनी न्यायासाठी प्रशासनाकडे धाव घेतली असून, वस्तीकडे जाणारा रस्ताच बंद झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तर जमीन मालक यांच्या म्हणण्याप्रमाणे ती जमीन पाच वर्षांपूर्वी खरेदी केल्यानंतर आता कुंपण घालण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी पुढील शेतकरी असलेल्या व्यक्तीने आमच्या जागेत अतिक्रमण केले आहे, ती जमीन आणि त्या रहिवासी यांना जाण्यासाठी दोन फुटाची वाट आम्ही कुंपण घालताना सोडून दिली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जागेचे नुकसान केले असून शेतकर्‍यांची कोणतीही वाट आम्ही अडविली नाही, असा खुलासा जमीन मालक दिनेश दोषी यांनी केला आहे.

Exit mobile version