खेडमध्ये कचर्‍यापासून खतनिर्मिती

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

खेड शहरासह ग्रामीण भागात वाढत्या कचर्‍याची विशेषतः प्लास्टिकयुक्त कचर्‍याची प्रशासनासाठी समस्या डोकेदुखी स्थानिक ठरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात जागेअभावी कचर्‍याच्या व्यवस्थापनाचा प्रश्‍न जटील बनत असताना शहरात मात्र विविध प्रभागांतून दिवसाकाठी 6 ते 7 टन उचलल्या जाणार्‍या कचर्‍याचे अपुर्‍या जागेत व्यवस्थापन होत आहे. न. प. च्या कचरा डेपोत ऑर्गेनिक वेस्ट कम्पोस्ट मशिनच्या सहाय्याने ओल्या कचर्‍यापासून महिन्याला सुमारे 5 टन खतनिर्मिती केली जात असून हे खत 5 रुपये किलो दराने विकलेही जात आहे.

2.01 चौ. किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या नगर परिषद हद्दीत एकूण 7 प्रभाग आहेत. अंदाजे 20 हजाराहून अधिक लोकसंख्या असून शहरात दिवसेंदिवस लोकवस्ती, टोलेजंग इमारती, छोटी-मोठी दुकाने, हॉटेल्स, टपरीवाले, फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. यात ग्रामीण भागातील ग्रामस्थही शहरात विविध कारणांसाठी वास्तव्य करत आहेत. शहर स्वच्छतेसाठी न. प. च्या स्वच्छता विभागात कायमस्वरूपी व कंत्राटी असे 60 सफाई कर्मचारी कार्यरत असून ट्रॅक्टर, छोटाहत्ती, अ‍ॅपे रिक्षा, छोटे ट्रॅक्टर, टीपर, डम्पर आदी 12 छोट्या-मोठ्या वाहनातून सुका व ओला कचरा उचलला जात आहे. गोळा केलेला कचरा समर्थनगर येथील कचरा डेपोत सुका व ओला असे वर्गीकरण करून त्यातील ओल्या कचर्‍यातून ऑर्गेनिक वेस्ट कंम्पोस्ट मशिनच्या सहाय्याने खतनिर्मिती केली जात आहे.

Exit mobile version