चंद्रभेटीचा महोत्सव

गीतरामायणामध्ये पुत्रभेटीचा घडे महोत्सव असे वर्णन ग.दि. माडगूळकर यांनी केले आहे. त्या धर्तीवर बुधवारी कोट्यवधी भारतीयांची चंद्रभेटीचा घडे महोत्सव अशी भावना झाली. ही भेट 2019 मध्येच व्हायची होती. पण तेव्हा अगदी अखेरच्या क्षणी आपले विक्रम नावाचे लँडर किंवा गाडी चंद्रभूमीवर स्थिरावू शकले नव्हते. पण तेव्हा पाय मागे येऊनही चारच वर्षात इस्रो आणि भारतीय वैज्ञानिकांनी घेतलेली झेप थरारक आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक थोडे आहे. दोन दिवसांपूर्वी रशियाने पाठवलेले चांद्रयान अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारचे भारताचे यश विशेष उठून दिसणारे ठरले. एकाच वेळी सर्व देशाला अभिमान वाटाव्या अशा घटना आता फारच दुर्मीळ झाल्या आहेत. क्वचित विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजय मिळवला तर सर्व भारत थरारून उठतो. एरवी, आपल्या रोजच्या आयुष्यात इतके राजकारण घुसले आहे की, सर्व समाज एकाच वेळी सर्व पक्ष, जाती व वर्गभेद विसरून मुक्तपणे आनंद व्यक्त करतो आहे असे क्षण नष्ट झाले आहेत. चांद्रयानाच्या निमित्ताने हा क्षण दिसला. 2019 च्या चांद्रयान-दोन ही मोहिम सर्वस्वी अपयशी झाली नव्हती. त्या मोहिमेत चंद्रावर उतरणारी गाडी घसरली. पण त्या गाडीला तेथपर्यंत नेऊन पोचवणारे जे यान किंवा अर्बायटर होते ते चंद्राच्या कक्षेत ठरल्यानुसार फिरत राहिले. त्याने चंद्राच्या पृष्ठभागाचे व वातावरणाचे सर्व अंगांनी परीक्षण केले. त्याची छायाचित्रे काढली. त्यांच्याच आधारे यंदाचे चांद्रयान-तीन हे चंद्रावर कोठे उतरवता येईल हे ठरवता आले. चंद्रावर सलग अशी जमीन कमी ठिकाणी आहे. डोंगर, दऱ्याखोऱ्या, खडकाळ भाग बरेच आहेत. शिवाय धुळीचे प्रचंड थर आहेत. त्यामुळे विक्रमसारख्या गाडीचे चार पाय स्थिर उभे राहू शकतील व ते फिरू शकेल अशी जमीन शोधणे हे मोठे आव्हान होते.

दक्षिण ध्रुवाचे महत्व

त्यातच भारताने हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचे ठरवले होते. या भागात बराच अंधार व कमालीची थंडी असते. तापमान उणे दोनशे डिग्री इतके खाली जाते. त्यात टिकून राहणे, त्यासाठी विक्रमला योग्य ते इंधन पुरवणे हे आव्हान होते. ते इस्रोने समर्थपणे पेलले आहे. 2008 मध्ये आपली पहिली चांद्रयान मोहिम सुरू झाली. त्यावेळी चंद्राच्या वर विशिष्ट अंतरावर यान फिरते ठेवून त्याद्वारे चंद्राचे निरीक्षण करणे हाच हेतू होता. चंद्रावर पाणी व बर्फ असल्याचा महत्वाचा शोध त्या यानाच्या निरीक्षणामधून लागला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रचंड बर्फ आहे. भावी काळात चंद्राचा अवकाश मोहिमांसाठीचा वाहनतळ म्हणून उपयोग करता येईल काय याची चाचपणी केली जात आहे. त्यासाठी पृथ्वीवरून सोडलेली याने चंद्रावर थांबा घेतील व तेथून नव्याने इंधनसाठा घेऊन ती पुन्हा अवकाशात झेपावू शकतील अशा कल्पना काही वैज्ञानिकांनी मांडल्या आहेत. चंद्रावरच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फातून मानवी उपयोगासाठीचे पाणी, ऑक्सिजन तसेच हायड्रोजन हे इंधन निर्माण करता येईल असाही एक तर्क आहे. त्यासाठी जे संशोधन व प्रयोग करावे लागतील त्याचा पाया भारताच्या चांद्रयान-तीन मोहिमेतून घातला गेला आहे. चंद्रावर विक्रम यशस्वीपणे उतरवता येणे हीदेखील अवकाश संशोधनातील जबरदस्त कामगिरी आहे. पृथ्वीवरच्या नेहमीच्या विमान प्रवासातही सर्वात मोठी सावधगिरी विमान उडताना व उतरताना बाळगावी लागते. उडताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण भेदून विमानाला एका विशिष्ट उंचीवर स्थिर व्हायचे असते. नंतर उतरताना आधीचा प्रचंड वेग झटक्यात कमी करावा लागतो. मात्र हे करताना धीमेपणाने ब्रेक्स लावावे लागतात. गुरुत्वाकर्षणामुळे विमान खाली खेचले जाऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. चांद्रयानालाही हेच लागू होते. चंद्रावरचे गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या सुमारे एकषष्ठांश असते. त्याच्याशी जुळवून घेत उतरण्याची कसरत करावी लागते. खूप जोर लावून वेगाने गेले तर यान कोसळू शकते, जे रशियाच्या बाबतीत झाले.

अंतराळातील राजकारण

2019 च्या अपयशानंतर आपल्या शास्त्रज्ञांनी हर तऱ्हेच्या शक्यतांचा अभ्यास करून विक्रम लँडर अचूक उतरवले. चंद्र हा पृथ्वीपासून सुमारे चार लाख किलोमीटर अंतरावर आहे. पण 14 जुलै रोजी यानाचे प्रक्षेपण झाल्यापासून त्याच्या प्रवासाच्या प्रत्येक क्षणाचे नियोजन भारतीय निरीक्षण केंद्रातून केले गेले. यान उतरताना सर्व नियंत्रण येथूनच केले गेले व ते बरोबर ठराविक वेळी उतरेल हेही ठरवले गेले. हा सर्व विज्ञानाचा चमत्कार आहे. असे करू शकणारा भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे. पुन्हा वापरता येणारी याने व प्रक्षेपकांच्या तंत्रज्ञानात आपण घेतलेली भरारी विलक्षण आहे. जगातील राजकारणातील पुढच्या लढाया अंतराळात लढल्या जातील असे भाकित अनेकदा झाले आहे. चंद्रावर पहिला माणूस उतरला तो 1969 मध्ये, अमेरिकेचा नील आर्मस्ट्राँग. मात्र रशियाने त्याच्या दहा वर्षे आधीच चंद्रावर आपले यान यशस्वीपणे पाठवले होते हे अनेकांना ठाऊक नसते. चंद्राच्या जमिनीवर पहिले निर्मनुष्य यान उतरवण्याचा मानही रशियाकडे आहे. (1966). 1969 नंतर अमेरिकेने असंख्य वेळा चांद्रमोहिमा आखल्या. मध्यंतरीच्या खंडानंतर आता पुन्हा सर्वच देशांचे लक्ष चंद्राकडे वळले आहे. इस्त्राईल, जपान यांच्यासह अनेक देश अशा मोहिमांच्या मागे आहेत. मात्र आजतागायत यशस्वी ठरलेले नाहीत. आता अमेरिकेतून नासासारख्या सरकारी व एलॉन मस्कसारख्या खासगी यंत्रणा पुन्हा नव्याने चंद्रावर माणूस पाठवण्याच्या मोहिमा आखत आहेत. अलिकडेच भारतानेही याबाबतच्या करारावर सह्या केल्या होत्या. कालच्या यशामुळे अमेरिकी मोहिमांमध्ये भारताला बरोबरीचे व सन्मानाचे स्थान मिळेल. तसेच चंद्रावरच्या वसाहती, खनिज संशोधन इत्यादी संभाव्य मोहिमांमध्येही भारताची भूमिका कळीची ठरेल. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू, विक्रम साराभाई इत्यादींनी अवकाश संशोधनाचे रोप लावले. त्याला आलेली फळे आपण चाखत आहोत. इथून पुढच्या काळातील अंतराळातील राजकारणात भारताला जे निर्णायक स्थान मिळेल त्याचे श्रेय या पूर्वसुरींचेच असेल हे लक्षात ठेवायला हवे. 

Exit mobile version