नवी मुंबईत तापाची साथ

बाह्यरुग्णांत 50 टक्के रुग्ण ताप, सर्दी, खोकल्याचे; पाच वर्षाखालील लहान मुलांचे प्रमाण जास्त

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

गेल्या काही दिवसांपासून देशासह इतर शहरात इन्फल्युन्झाचा संसर्ग वाढत आहे. नवी मुंबई शहरात ही महापालिकेच्या बाह्यरुग्णांत 50 टक्के रुग्ण ताप, सर्दी, खोकल्याचे आढळत आहेत. यामध्ये पाच वर्षाखालील लहान मुलांमध्ये प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात ही इन्फल्युन्झा संशयित रुग्ण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वातावरणातील उष्ण-दमट हवामान आणि वायू प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. नोव्हेंबर- डिसेंबरपासून नवी मुंबई शहरात ही ताप विशेषतः सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. पालिका तसेच खासगी रुग्णालयात ताप, सर्दी, खोकल्याने जडलेल्या रुग्णांत वाढ झाल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त होत आहे. नोव्हेंबर डिसेंबर पासुन स्वाइन फ्ल्यू (H1N1)चाचण्या केल्या आहेत, मात्र त्या निगेटिव्ह येत आहे. वाशीतील महापालिका रुग्णालयातील बाह्य रुग्णांची संख्या 1400 वर गेली आहे. तसेच महापालिकेच्या तीन रुग्णालयात 5 वर्षा खालील 300 ते 400 लहान मुले दररोज उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामध्ये काही मुलांच्या फुफ्फुसेवर परिणाम होऊन सूज येते. त्यामुळे नागरीकांनी घाबरून न जाता वाफ घेणे, गरम पाणी पिणे, मुखपट्टी वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अशा प्रकारे काळजी घेण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.

महापालिका आरोग्य विभागाने बालरोगतज्ञ आणि डॉ बनसोडे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांच्याशी चर्चा केली आहे. ओपीडीमध्ये, विशेषतः पाच वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये खोकला सर्दी प्रकरणांमध्ये सतत वाढ पाहत आहोत. H1N1 चाचण्या करीत आहोत मात्र त्या निगेटिव्ह येत आहेत. H3N2 किंवा adenovirus असण्याची शक्यता आहे. एनआयव्ही पुणेने काही वैद्यकीय महाविद्यालयात तसेच ठाण्यातील आरजीएम्स याठिकाणी इन्फल्युन्झा चाचण्या होत आहेत. प्राथमिक स्वरूपात महापालिका आरोग्य विभागाकडून इन्फल्युन्झा निदानासाठी 2-3 नमुने ठाण्याला पाठवण्यात येणार आहेत.

Exit mobile version