महाविद्यालयात हेल्मेट सक्तीची नोटीस बजावणार
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
दुचाकी वाहनांच्या वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने हेल्मेटची सक्ती केली आहे. परंतु अशा सक्तीला मोटरसायकल चालविणार्यांकडून सर्रास फाटा दिला जात आहे. अजूनही डोक्यावर हेल्मेट न घालता जीवघेणा प्रवास सुरू आहे. नवी मुंबईत अपघातांची संख्या कमी होत असली तरी शहरातील खासगी कंपन्या, शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि महाविद्यालये या सर्वांना विना हेल्मेट प्रवास न करण्याच्या सूचना देऊन नोटीस जारी करावे, असे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी नवी मुंबई आरटीओ विभागाला दिले आहेत. भीमनवार यांनी नवी मुंबई आरटीओच्या नवीन इमारतीचे काम पाहिले. या पाहणी दौऱ्यात त्यांनी या सूचना दिल्या.
रस्त्यांवरील अपघातांमध्ये डोक्यात हेल्मेट नसल्यामुळे दुर्देवाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याने दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा, असे असतानादेखील आजही दुचाकीस्वार विना हेल्मेट रस्त्यावरून सुसाट वाहने चालवित आहेत. वाढत्या वाहनांबरोबर शहरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांची संख्यादेखील वाढत चालली आहे. राज्यात वाहन अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण अधिक असून यात हेल्मेट न घातल्याने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नवी मुंबई शहरात यंदा अपघातांची संख्या कमी आहे. परंतु, मृत्यू पावलेल्यांमध्ये विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरात हेल्मेटबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. परिवहन आयुक्तांनी शहरातील सर्व खासगी कंपन्या, महाविद्यालये, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी कर्मचारी, विद्यार्थ्यांना हेल्मेट घालूनच प्रवास करावा याबाबत सूचना द्याव्यात, असे आदेश दिले आहेत.