महापालिकेकडून कारवाईस उशीर
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सायन-पनवेल द्रुतगती मार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीविना अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेली किमान 34 होर्डिंग काढून टाकण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना वेळोवेळी करूनसुद्धा त्यावर कारवाई करण्यास महापालिकेकडून चालढकल केली जात आहे. ही बाब नियमांचा भंग करणारी असल्याचे नमूद करत ती त्वरित हटवण्याची कारवाई करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महापालिका आयुक्तांना 25 एप्रिल रोजी कळविण्यात आले आहे.
सायन-पनवेल द्रुतगती महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असताना व त्याच्या पथ किनाऱ्यालगत जाहिरात फलक उभारण्याचे हक्क प्रदान करण्याचा अधिकार हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा असताना, नवी मुंबई व पनवेल महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीविना हे होर्डिंग उभारण्यास परवानगी दिली आहे. हे होर्डिंग शहर विद्रुपीकरणासही कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे ती सर्व होर्डिंग काढून टाकण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियत्यांनी नवी मुंबई व पनवेल महापालिका आयुक्तांना केली आहे. पत्रासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नवी मुंबई महापालिका हद्दीतून जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गाचे सर्वेक्षण करून तब्बल 34 अनधिकृत होर्डिंगचा तपशील जोडला आहे.
शासन नियमानुसार, नागरी व औद्योगिक क्षेत्रातून जाणाऱ्या द्रुतगती मार्गावरील रस्त्याच्या मध्यापासून 60 मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून 15 मीटर यापैकी जास्त असेल अशा अंतरावर होर्डिंग उभारण्यास परवानगी आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केलेल्या सर्वेक्षणात नवी मुंबई महापालिका हद्दीत सायन-पनवेल मार्गालगत उभारण्यात आलेली होर्डिंग ही रस्त्याला खेटून तसेच, रस्त्यालगत असलेल्या इमारतींवर बिनदिक्कत अनधिकृतरीत्या उभारण्यात आल्याचे दिसून आले आहे. सन 2020पासून सार्वजनिक बांधकाम विभागाने नवी मुंबई महापालिकेला सायन-पनवेल द्रुतगती मार्गालगत असलेली अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्यासंदर्भात वारंवार कळवूनही महापालिकेच्या परवाना व अतिक्रमणविरोधी विभागाकडून कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.