| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि बाळा कुंभार यांनी पदभार स्वीकारल्यापासून धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच रविवारी (दि.19) मध्यरात्री तालुक्यातील कोळखे येथील एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये नियमांचे उल्लंघन करून महिला कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांचे मनोरंजन केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून व्यवस्थापकासह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळखे गावातील ‘गोल्ड डिगर बार अँड रेस्टॉरंट येथे मध्यरात्री कारवाई करण्यात आली. यावेळी बारमध्ये परवानगीपेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांना ठेवून त्यांच्याकडून ग्राहकांचे मनोरंजन करण्यासाठी नृत्य करवून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. वपोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हजरत पठाण, पो.ना. संतोष अवघडे व पथकाने येथे छापा टाकला असता महिला कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांच्या अंगाशी लगट करणे, अश्लील हावभाव करणे तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी बारचे व्यवस्थापक विनोद जनार्दन नायक, दोन पुरुष वेटर आणि सात महिला वेटर अशा एकूण 10 जणांविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.







