बदलत्या हवामानामुळे आजारांचा ताप

| रायगड | प्रतिनिधी |

दुपारी उन्हाळा, संध्याकाळी गारवा अशा वातावरणातील बदलांमुळे आजारांचा तापही वाढला आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, दमा तसेच त्वचाविकारांशी संबधित तक्रारी वाढत्या आहेत. काही मुलांमध्ये घसादुखी, टॉन्सिल्स वाढल्यामुळे समस्या जाणवत आहे. कोरडा खोकला, सर्दी यांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये सांधेदुखीच्या तक्रारी दिसून येत आहेत.

सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये या प्रकारच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपासून प्रदूषण आणि वाहतूककोंडीमुळे या तक्रारींमध्ये भर पडली आहे. थंडीची सुरुवात झाली की हा त्रास वाढताना दिसतो. खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

परस्पर औषधे घेऊ नका
आठवडाभरापेक्षा अधिक काळ सर्दी, खोकला राहिला तर वैद्यकीय उपचार सुरू करायला हवेत, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. काही जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषधे घेतात. परस्पर औषधे घेऊ नयेत. काहीवेळा खोकला नियंत्रणात येत नाही, उलट तो वाढतो. त्यामुळे थंडीमध्ये होणाऱ्या या आजारांकडे दुर्लक्ष करू नका, असे मार्गदर्शन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. हवेच्या खालच्या थरामध्ये स्थिर झालेल्या प्रदूषणामुळे डोळ्यांची जळजळ होण्यासह नाक व घसा खवखवतो. या वातावरणामध्ये ताप टाळण्यासाठी दरवर्षी लसीकरण करावे. लहान मुलांमध्येही लसीकरण चुकवू नये, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हे करा
एसीचा वापर टाळा, उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळा, प्रतिजैविकांचे सेवन वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नका, गरम पाणी प्या, ताजे अन्न खा.

Exit mobile version