वाढत्या उष्णतेमुळे मुलांची मैदानाकडे पाठ

| पनवेल | प्रतिनिधी |

शाळांना उन्हाळी सुट्टी लागताच लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत असते. काही मुले आपल्या गावी जाणे पसंत करतात, तर अनेक जण सकाळपासून रात्रीपर्यंत परिसरातील मैदानांवर क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी यांसारखे विविध खेळ खेळताना दिसतात. काही नागरिक चालणे, व्यायाम तसेच मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी मैदानांवर येत असतात. मात्र यंदाच्या वर्षी अनेक मैदानांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

दररोज वाढणारे तापमान, अंगाची लाही लाही करणारा उकाडा आणि वाढता उष्मा यामुळे नागरिकांसह लहान मुलांनीही मैदानांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दुपारच्या वेळेत मैदान पूर्णपणे ओस पडत असून सायंकाळीही पूर्वीसारखी गर्दी दिसून येत नाही. उष्णतेमुळे घराबाहेर पडणे कठीण होत असल्याने मुलांचा कल मोबाईल, टीव्ही आणि घरातील थंड वातावरणाकडे वाढत आहे.

सुट्टी हा शब्द मुलांसाठी आनंद, खेळ आणि मैत्रीचे नाते निर्माण करणारा मानला जातो. मात्र वाढते प्रदूषण, झाडांची कत्तल, काँक्रीटीकरण आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यामुळे ऋतूंचे स्वरूप बदलताना दिसत आहे. त्याचा परिणाम आता थेट दैनंदिन जीवनावर जाणवत असून भविष्यात याची मोठी किंमत पुढील पिढीला मोजावी लागू शकते, अशी चिंता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे ही काळाची गरज बनली आहे.

Exit mobile version