| पनवेल | प्रतिनिधी
तळोजा एमआयडीसीमधील ‘फाईब्रो कास्ट’ या कंपनीला सकाळी अचानक भीषण आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या तीव्रतेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच तळोजा एमआयडीसी अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अनेक फायर टँकर्सच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणली. तसेच आगीतून पसरणारा धूर आणि ज्वाळा रोखण्यासाठी अतिरिक्त दलाची मदतही घेण्यात आली. अखेर शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यंत्रसामग्री, तयार साहित्य व कच्चा माल जळून कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत तळोजा पोलीस तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने स्वतंत्र तपास सुरू केला आहे. विजेच्या शॉर्टसर्किटची शक्यता नाकारण्यात आलेली नाही. दरम्यान, तळोजा एमआयडीसी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्य आल्याने औद्योगिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







