गॅस कटरने एटीएम फोडताना भीषण आग

13 लाखांच्या नोटा चोरट्यांच्या डोळ्यासमोर राख

| छत्रपती संभाजीनगर । वृत्तसंस्था ।

छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडामध्ये एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडल्याची घटना समोर आली आहे. दोन चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे एटीएमला आग लागून जवळपास 13 ते 15 लाख जळून खाक झाल्या. ही घटना सोमवारी पहाटे 4.15 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी पहाटे 4.15 वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तीन ते चार अज्ञात चोरटे आले. त्यांनी त्यांची कार बँकेसमोर उभी करून तोंडाला कपडा बांधलेल्या दोन व्यक्तींनी एटीएममध्ये प्रवेश करून शटर बंद केले. त्यानंतर त्यातील एका व्यक्तीने एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला व सोबत आणलेल्या गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशिन कापणे सुरू केले. मशिनचा समोरचा भाग कापला गेला. परंतु एटीएम मशिनचा आतील भाग तसाच असल्याने गॅस कटरची नळी फिरली आणि त्यात गॅस कटरची ठिणगी पडली. त्यामुळे एटीएममधील जवळपास 13 ते 15 लाख रुपयांची रक्कम जळून खाक झाली. यानंतर बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली. ही बाब चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांनी गॅस कटर मशिन व अन्य साहित्य तेथेच टाकन पळ काढला.

चोरट्यांनी एटीएममधील एक सीसीटीव्ही कॅमेरा तोडला तो बंद होता. त्याच्या बाजूला दुसरा डिजिटल कॅमेरा होता, त्या कॅमेऱ्यात ही घटना चित्रीत झाली आहे. पोलिस तपासासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version