। पेण । संतोष पाटील ।
पेण-खोपोली मार्गावरील सनसिटी इमारतीमधील स्टेट बँकेची एटीएमची दोन मशिन फोडून चोरट्यांनी 56 लाख 34 हजार 800 रूपये लंपास केले. हा प्रकार सोमवारी पहाटे घडला.
या एटीएम मध्ये दोन ए.टी.एम मशिनी असून या मध्ये दोन दिवसापूर्वीच 84 लाख रूपये भरण्यात आले होते. शनिवार-रविवार असल्याने 84 लाख रूपयांपैकी साधारणताः 25 लाख रूपयाच्या आसपास रक्कम ग्राहकांनी एटीएमद्वारे काढून घेतली होती. तर 500 च्या काही नोटा जळलेल्या स्थितीत आढळले असून साधारणताः दोन लाख रुपयांच्या आसपास रक्कम एका ड्रॉवरला शिल्लक सापडली आहे तर 56 लाख 34 हजार 800 रुपयांची चोरी झाल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले आहे.
महत्वाची बाब म्हणजे चोरटयांनी पहाटे 4 ते 4ः30 च्या सुमारास हा चोरीचा प्रकार झालेला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून ही दोन्ही एटीएम मशिन गॅस कटरच्या सहाय्याने कटिंग करून रोख रक्कम चोरलेली आहे. घटणास्थळी गॅस कटर व गॅस सिलेंडर टाकून चोर पसार झाले आहेत.
सदर घटनेचा पेण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 11/2022 नुसार भा.कलम 380/435 नुसार गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्हयाचे अधिक तपास अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस निरिक्षक दयानंद गावडे, उपपोलिस अधिकारी विभा चव्हाण, व पोलिस निरिक्षक बाळा कुंभार यांच्या मदतीने करत आहेत.
तपासासाठी वेगवेगळ्या आठ टीम केल्या असून,या टीम तपासासाठी रवाना झाल्या आहेत. यातील आरोपींना लवकरात लवकर अटक केले जाईल.आजुबाजूच्या सीसी टीव्ही कॅमेर्याच्या छायाचित्रणाच्यामुळे आरोपी तपासण्यास मदतच होणार आहे. – अतुल झेंडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक
एटीएम रुममध्ये सीसी कॅमेरे नाहीत
एटीएम रुममध्ये सीसी कॅमेरे नाहीत अथवा दिवसभर येथे सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आलेला नाही. या विषयी ए.टी.एम मशिन विभागाचे प्रमुख वाटोलकर यांना विचारणा केली असता त्यांनी प्रसार माध्यमांना उत्तर देण्यास टाळले. या वरून बॅकेचा हा हलगर्जी पणा समोर येत आहे. जर बॅकेच्या त्या ए.टी.एम मशिन ठेवलेल्या खोलीत सि.सि.कॅमेरे असते तरी हा झालेला प्रकार टाळता येउ शकला असता परंतु बॅकेच्या हलगर्जी पणा मुळेच हा प्रकार घडला असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.