फिफा विश्‍वकरंडकाची पात्रता फेरी

भारतीय संघ छेत्रीविना उतरणार मैदानात

। दोहा । वृत्तसंस्था ।

दिग्गज खेळाडू सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केल्यानंतर भारतीय फुटबॉल संघ प्रथमच मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ आशियाई खंडातील बलाढ्य कतारशी दोन हात करणार आहे. फिफा विश्‍वकरंडकाची पात्रता फेरी सुरू असून अ गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढती मंगळवारी पार पडत आहेत. भारतीय फुटबॉल संघाला तिसर्‍या फेरीत पोहोचण्यासाठी कतारविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे. अ गटातून कतारने 13 गुणांसह पुढील फेरी गाठली आहे. भारताने कतारविरुद्धच्या लढतीत विजय मिळवल्यास त्यांचाही मार्ग मोकळा होणार आहे, मात्र भारत-कतार ही लढत अनिर्णित राहिल्यास त्यांना अफगाणिस्तान-कुवेत या लढतीतील निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अफगाणिस्तान-कुवेत यांच्यामधील लढतही अनिर्णित राहिल्यास सरस गोलफरकाच्या जोरावर भारतीय संघाला आगेकूच करता येणार आहे, मात्र भारतीय संघ पराभूत झाला अन् अफगाणिस्तानच्या संघाने विजय मिळवला, तर भारताचे आव्हान तिथेच संपुष्टात येणार आहे.

सुनीलनंतर कोण?
भारतीय फुटबॉल संघाला एक प्रश्‍न गेले दशकभर सतावत आहे. स्ट्रायकर सुनील छेत्रीनंतर कोण? सुनील छेत्री निवृत्त झाल्यानंतरही भारताचा अव्वल दर्जाचा आक्रमक फळीतील खेळाडू सापडलेला नाही. रहीम अली याच्याकडून म्हणावी तशी कामगिरी झालेली नाही. मानवीर सिंग, विक्रम प्रताप सिंग, डेव्हिड एल. याचा आक्रमक फळीत समावेश केला जातो, पण त्यांनाही अद्याप चमक दाखवता आलेली नाही. भारतीय संघाला लवकरात लवकर सुनील छेत्रीचा उत्तराधिकारी शोधावा लागणार आहे.
Exit mobile version