वैध मतांच्या तुलनेत अपेक्षित मते न मिळाल्याचा फटका
। रायगड । प्रतिनिधी ।
निवडणूक प्रचारामध्ये विरोधकांचे डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम जप्त करू, अशा वल्गना अनेक उमेदवारांकडून केल्या जातात. हे डिपॉझिट जप्त करणे म्हणजे काय, असा प्रश्न अनेक मतदारांना पडतो. एकूण वैध मतांच्या तुलनेत अपेक्षित मते न मिळाल्यास उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली जाते. जिल्ह्यामधील सात विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार्या 73 उमेदवारांपैकी तब्बल 54 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
जिल्ह्यातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग, पेण, उरण, कर्जत व पनवेल या सात मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक पार पडली. जिल्ह्यातील या सात मतदारसंघामध्ये 111 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 38 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात 73 उमेदवार होते. यामध्ये महाड विधानसभा मतदारसंघातून पाच, पनवेल येथून 13, कर्जत येथून नऊ, उरणमधून 14, पेणमधून सात, अलिबागमधून 14, तर श्रीवर्धनमधून 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या उमेदवारांपैकी निवडणुकीत विजयी झालेले सात उमेदवार व पराभूत झालेल्या इतर 12 अशा एकूण 19 उमेदवारांनी आपली अनामत रक्कम वाचवली, परंतु उर्वरित 54 उमेदवारांचे मात्र अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही अनामत रक्कम आता सरकारी तिजोरीत जमा होणार आहे.
लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढवणार्या प्रत्येक उमेदवाराला विशिष्ट सुरक्षा रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.
यालाच अनामत रक्कम असे म्हणतात लोकसभा निवडणुकांसाठी ही रक्कम पंचवीस हजार रुपये, तर विधानसभा निवडणुकीसाठी ही रक्कम 10 हजार रुपये, अशी प्रत्येक उमेदवारामागे असते. कोणीही उठून निवडणुकीचे नामांकन भरू नये यासाठी ही तजवीज केलेली आहे.
लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार निवडणूक लढविणार्या उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश पेक्षा कमी मते मिळाली, तर त्याची सुरक्षा ठेव म्हणजेच अनामत रक्कम जप्त केली जाते. एखाद्या निवडणुकीत एकूण एक लाख 80 हजार वैध मते असतील, तर आपली सुरक्षा रक्कम म्हणजेच अनामत रक्कम वाचवण्यासाठी निवडणूक लढवणार्या प्रत्येक उमेदवाराला या मतांच्या एक षष्ठांश म्हणजेच किमान 30 हजार मते मिळवावी लागतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 86 टक्के उमेदवारांनी आपली अनामत रक्कम गमावली होती.
डिपॉजिट जप्त झालेले उमेदवार
मतदारसंघ उमेदवार
महाड 3
अलिबाग 11
पेण 4
कर्जत 6
श्रीवर्धन 9
पनवेल 10
उरण 11