। वडखळ । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे, मात्र यामुळे पेण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणार्या वडखळ येथील बाजारपेठेला याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
वडखळ येथे येणार्या प्रवाशांना वळसा घेऊन बाजारपेठेत यावे लागते. त्यामुळे ग्राहक संख्या कमी झाली असून येथील व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे रोडे- कांदळे फाट्यापासून सदर रस्ता सरळ वडखळला जोडण्यात यावा, अशी मागणी येथील व्यावसायिकांसह ग्रामस्थांनी केली आहे. एकेकाळी रायगड जिल्ह्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून वडखळकडे पाहिले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून सफेद कांदे, ओली- सुकी मासळी, पोहे, पापड, भात, मीठ, मोठ-मोठी हॉटेल्स, स्पेअर पार्ट दुकाने यासह येथील ग्रामीण भागातील नागरिकांकडून विक्रीसाठी येणारा भाजीपाला मोठ्या प्रमाणात आणि ताजेतवाने मिळत असल्याने मुंबई, पनवेलकडून येणारे पर्यटक येथे थांबून अनेक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करत होते. मात्र मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात वडखळ बायपास रस्ता झाल्याने पर्यटकांसह ग्राहकांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. बाजारपेठेत ये-जा करणार्या वाहनांना तसेच विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिकांना अंतर्गत रस्त्यातून वळसा घालून यावे लागते. त्यामुळे कादळे गावाच्या पुढे ठेवण्यात आलेल्या महामार्गाच्या खालील बोगद्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रोडे-कांदळे फाट्याजवळून सरळ रस्ता वडखळला जोडण्यात यावा, याकरिता वडखळ ग्रामपंचायतीच्या वतीने अनेकदा पत्र व्यवहार करण्यात आला आहे.