पन्नास टक्के बहिणी पैशांपासून वंचित

महिलांची बँकेबाहेर तुडुंब गर्दी

| कोलाड | वार्ताहर |

राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत दरमहा महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये रक्षाबंधनाआधी पहिला हप्ता ओवाळणी म्हणून जमा करण्यात आला. मात्र, पन्नास टक्के महिलांच्याच खात्यात दोन महिन्यांचा हप्ता (तीन हजार) जमा झाले. परंतु, अजूनही कोलाड खांब परिसरातील पन्नास टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यांची बँकेत पैसे जमा झाले की नाही यासाठी हेळसांड होताना दिसत आहे. तर, ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बँकेत जमा झाले आहेत, अशा महिलांची यादी बँकेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात यावी, यामुळे ज्यांचे पैसे बँकेत पैसे जमा झाले नाहीत, त्यांना रांगेत उभे न राहता घरी जाता येईल व यामुळे बँकेतील गर्दीही आपोआप कमी होईल.

या परिसरातील महिला या अतिशय दुर्गम भागात राहणार्‍या असून, त्यांना बाजारपेठेच्या ठिकाणी असलेल्या बँकेत आपले पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी 20 ते 25 किलोमीटर अंतरावरून पायपीट करावी लागते व बँकेत येऊन तासन्तास रांगेत उभे राहून वाट पाहावी लागत आहे. यासाठी कोणाची केवायसी झाली नाही तर कोणाचे बँक खाते बंद झाले असेल तर ते पुन्हा उघडण्यासाठी नवीन कागदपत्र जमा करावे लागत आहेत. यामुळे उन्ह पावसाची तमा न बाळगता सर्व महिलांना उपाशी पोटी बँकेत हेलपाटे मारावे लागत आहे.

अंगावडी सेविकांनी मोबाईलवर लाडक्या बहिणीचे ऑनलाईन फार्म भरले व ते सक्सेस झाले. परंतु, असे असताना लाडक्या बहिणींना बँकेत घिरट्या माराव्या लागत आहेत. ज्या लाडक्या बहिणींची काही कारणानं खाती बाद झाली आहेत याचे कारण शोधण्यासाठी लाडक्या बहिणींची हेळसांड होत आहे.
यामध्ये बँकेतील कर्मचारीवर्गाची कामे वाढली असल्याचे दिसून येत आहे. गणेश उत्सव काही दिवसांवर आला असून, व्यापारी माल खरेदी करण्यासाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी करीत आहेत. दरम्यान, खातेदारही पैसे काढण्यासाठी गुंतले आहेत, यामुळे बँकेत गर्दी होत असून, शासनाने लाडक्या बहिणींसाठी वेगळे कर्मचारी नेमणे जरुरीचे आहे. त्यामुळे सर्वच जनतेची कुचंबना होणार नाही.

Exit mobile version