| नेरळ | प्रतिनिधी |
पुणे येथील एका व्यक्तीने आपल्या भाच्याला महाविद्यालयीन फी भरण्यासाठी गुगल पे वरून पैसे पाठवले होते. ते पैसे चुकीने दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात जमा झाले होते. दरम्यान, पैसे चुकीच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून संबंधित महिलेने ती रक्कम परत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील बालकृष्ण पयाली यांनी त्यांचा भाचा मुद्रिका त्रिपाठी याला महाविद्यालयीन फी भरण्यासाठीची 80 हजार रुपयांची रक्कम त्यांच्या वडीलांच्या गुगल पेवर पाठवली. परंतु, संबंधित रक्कम पाठवताना पयाली यांच्याकडून मोबाईल क्रमांकांतील एक क्रमांक चुकला आणि ती रक्कम त्रिपाठी यांना न जाता अन्य बँक खात्यात पोहचली. दरम्यान, त्रिपाठी यांना पैसे पोहचले नसल्याची खात्री पटल्यावर बालकृष्ण पयाली यांनी त्या बँक खात्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी हे बँक खाते हे कर्जत तालुक्यातील एका महिलेच्या नावे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्या बँक खात्याची खात्री केली असता ते बँक खाते डिकसल येथील नलिनी कर्डीकर-गायकवाड यांचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नेरळ पोलिसांच्या मदतीने पयाली संबंधित महिलेच्या घरी पोहोचले. त्यावेळी नलिनी कर्डीकर-गायकवाड यांनी देखील आपल्याला दुसऱ्याच्या अकाउंटमधून पैसे आले होते आणि त्यामुळे ते पैसे खर्च केले नव्हते, अशी माहिती दिली. त्यांनी लगेचच आपल्या खात्यात आलेली 80 हजार रुपयांची रक्कम बालकृष्ण पयाली यांच्या बँक खात्यात वर्ग केली.






