शिव समर्थ महादेववाडीतील मुलांची प्रेरणादायी कामगिरी
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत हद्दीतील शिव समर्थ महादेववाडी येथील पाच ते बारा वयोगटातील चिमुकल्या मुलांनी दिवाळी सुट्टीचा अर्थच बदलून टाकला आहे. खेळायच्या, धमाल करण्याच्या वयात या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती स्वतःच्या कल्पकतेतून साकारली होती. या उपक्रमाला तालुक्यासह परिसरातून भरभरून प्रतिसाद आणि कौतुक मिळाले. एवढ्यावरच न थांबता या मुलांनी आता प्रत्यक्ष रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. प्रवासादरम्यान मुलांनी संपूर्ण गड-किल्ल्याची माहिती घेतली आणि अनेक ऐतिहासिक ठिकाणांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी महादरवाज्याचे बारकाईने निरीक्षण केले, हत्ती तलाव व बजरंगबली मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर शिरकाई देवी मंदिर, ऐतिहासिक बाजारपेठ, स्मारक, मेणा दरवाजा, महाराजांच्या आठ राण्यांचे महाल, महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर, टकमक टोक, राजवाडा, गंगा सागर, लोखंडाची तोफ आणि थंड पाण्याचा झरा, दारु कोठार अशी अनेक ठिकाणे प्रत्यक्ष पाहिली आणि अनुभवली.






