जितेंद्र आव्हाड- गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती विकृत होत चालली आहे, याचे भडक उदाहरण संपूर्ण जगाने गुरुवारी पाहिले. सतत बिहारच्या नावाने खडे फोडणारे नेते आणि कार्यकर्त्यांना लाज आणणारी घटना विधानभवनाच्या लॉबीत घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कपडे फाटेस्तोवर हाणामारी झाली. लोकशाहीचे मंदिर समजल्या जाणाऱ्या विधिमंडळात घडलेल्या घटनेते महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला काळीमा फासला आहे.
एकदिवसापूर्वी गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांच्यात जोरदार वाद झाला होता. हे प्रकरण शिवीगाळपर्यंंत गेलं होतं. त्यानंतर आता विधानभवनात या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. दोघांच्याही कार्यकर्तांमध्ये तुफान हाणामारी झाली, एकमेकांना शिवीगाळही करण्यात आली. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान गुरुवारी (17 जुलै) दुपारच्या सुमारास गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ होते. यावेळी त्यांच्यात धक्काबुक्की झाली, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली, धक्काबुक्की झाली. प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच विधानभवन परिसरात उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास पाच ते दहा मिनिटं हा वाद सुरु होता. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण आणि शिवीगाळही केली.
मागील काही वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण किती असंस्कृत झाले आहे, याचे दर्शन पावलोपावली होताना दिसत आहे. रस्ता असो की शासकीय कार्यालयांमधील बैठकांमध्ये नेते हमरीतुमरीवर आल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. पण, आता हे लोण विधिमंडळातही पोहोचल्याने महाराष्ट्राची नाचक्की होताना पाहावे लागत आहे. कुणाच्या कार्यकर्त्याला कुणी मारहाण केली, हे महत्त्वाचे नाही. विधिमंडळाच्या आवारात हा राडा झाला, हे महाराष्ट्राला शोभणारे नव्हते. रस्त्यावरील वाद विधिमंडळात पोहोचला आहे. हा वाद कधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, मंत्री यांच्या दालनापर्यंत पोहोचेल, हे समजणारही नाही. अनेक नेत्यांची भाषा आणि कृती असभ्यतेच्या सीमा ओलांडत आहेत. त्यात मंत्रीही मागे नाहीत. या सर्वांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का पोहोचत असून, लोकशाहीच्या मंदिराची या कार्यकर्त्यांनी शोभा केल्याने सर्व स्तरातून छी-तू होत आहे.
विधानसभाध्यक्षांकडून चौकशीचे आदेश
विधानभवनातील या राड्याची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. त्यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
अख्ख्या महाराष्ट्राला दिसलं की हल्ला कोणी केला, आम्हाला यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचा नाही. विधानभवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार, काय गुन्हा आहे आमचा? सत्तेचा इतका मुजोरपणा, इतका माज.
आ. जितेंद्र आव्हाड
गुंडांच्या पोशिंद्यांवरती आणि गुंडांवरती कारवाई केली पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई करावी. विधानभवन हे पवित्र मंदिर आहे, तिथे अशाप्रकारे मारामारी होत असेल तर हे चुकीचं आहे. लोकप्रतिनिधींना धक्काबुक्की होत असेल, मारहाण होत असेल तर हे चुकीचं आहे. हे गुंड विधानभवनात आलेच कसे? त्यांना पास कसा मिळाला? त्यांना पास देणारा आमदार कोण? याबाबत चौकशी झाली पाहिजे?
उद्धव ठाकरे,
माजी मुख्यमंत्री
घडलेली घटना योग्य नाही. मारामारी करणं, विधानभवनात करणं योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींच्या अंतर्गत हा परिसर येतो, त्यांनी घटनेची दखल घ्यावी. अध्यक्षांनी कडक कारवाई करावी, अशी विनंती मी केली आहे. हे विधानसभेला शोभणारं नाही, त्यामुळे कारवाई झालीच पाहिजे.
देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री
