राज्यातील कायदा व सुव्यवस्थेता पुरता बोजवारा
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामुळे गाजणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शुक्रवारी (दि.1) अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये झालेल्या वादामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरले आहे. कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळ परिसरातच एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोघांमधील वाद एवढा वाढला की, त्या दोघांना थांबवण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली. मात्र, यामुळे शिंदे गटामध्ये सर्वकाही आलबेल नसून, अंतर्गत वाद सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेता पुरता बोजवारा उडाला आहे. गणेशोत्सवादरम्यान आमदाराने केलेला गोळीबाराचे प्रकरण समोर असतानाच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला पोलीस ठाण्यातच गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेवकाला थेट लाईव्ह गोळ्या घालण्यात आल्या. त्यात आता विधानभवनाच्या लॉबीमध्येच सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांमध्येच बाचाबाची, धक्काबुक्की झाल्याने राज्यात चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. हा वाद नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. दरम्यान, थोरवे यांनी मतदार संघातील कामावरून भुसे यांना जाब विचारल्याने ही वादावादी झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील धक्काबुक्कीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देण्याचे टाळले. या वादाबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, काहीतरी काय विचारता. अधिवेशनाचा विषय आहे, त्यावर विचारा. दरम्यान, शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी असा वाद झालाच नाही, असे ते म्हणाले.
मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत जवळपास 15 ते 20 आमदारांसमोर फ्री स्टाईल झाल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी सभागृहात बोलताना केला. सरकारने या घटनेची चौकशी करावी. तसेच, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज विधिमंडळाच्या पटलावर सादर करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे काहीही घडले नसल्याचे नमूद करत सभागृहाचे कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला.
दादा भुसे निगेटिव्ह मंत्रीः आ. थोरवे
गेल्या दोन महिन्यांपासून मंत्री असलेले दादा भुसे यांच्या खात्यातील एका कामाचा पाठपुरावा माझ्यासह भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला होता. परंतु, दादा भुसेंनी अजूनपर्यंत ते काम केलं नाही. त्यामुळे आज त्यांना मी भेटलो आणि विचारलं की दादा बाकीच्या लोकांची कामं तुम्ही बैठकीत घेतली. परंतु, माझ्यासह मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं काम तुम्ही केलं नाही. त्यानंतर ते माझ्यासोबत चिडून बोलायला लागले. मी म्हटलं आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत. मग मंत्र्यांकडून अशी उत्तरं आम्ही का ऐकून घ्यायची. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मी काय तुमच्या घरी खायला येत नाही. दादा भुसे एकप्रकारे निगेटिव्ह मंत्री आहेत. जमिनीवर राहून लोकांची कामं करायला हवी. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं आहे, की तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर, तोंडावर वाजवून न्याय मिळवा, आणि त्यामुळे माझ्यातला शिवसैनिक जागा झाला. दादा भुसेंनी लोकांची कामं करावी, एवढचं मी सांगेन, असं आ. महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केलं.
कोण भिडले, कोण नाही भिडले, हे मला माहीत नाही, पण हे गंभीर आहे. महान नेत्यांची परंपरा या महाराष्ट्राने पाहिली, पण असा प्रकार कधी झाला नाही. विधानसभेचे नावलौकिक होते, पण त्याला आज काळिमा फासला गेला.
जितेंद्र आव्हाड
विधिमंडळाची सुरक्षा वाऱ्यावर मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात बाचाबाची झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित करत याबाबत विधिमंडळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून खुलासा करण्याची मागणी केली. त्यावर वायरिंगचे काम सुरू असल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याची धक्कादायक स्पष्टीकरण विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. त्यामुळे विधिमंडळाच्या सुरक्षेबाबतही शासन गंभीर नसल्याचे चित्र यावरुन दिसून येते. यावेळी उपसभापती आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली आणि उपसभापतींनी कामकाज एक तासासाठी तहकूब केलं.