। रायगड । प्रतिनिधी ।
बेकायदा मासेमारी, माशांचा प्रजनन कालावधी असल्याने मच्छीमार बांधवांनी 15 ऑगस्टनंतर मासेमारी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मासेमारीला मोठ्या उत्साहात सुरुवात केल्यावर अवघे 10 दिवस होत नाहीत, तोच वादळी वार्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. समुद्रात अचानक सोसाट्याचा वारा आल्याने काही बोटी शनिवारी तर उर्वरित रविवारी पहाटेच्या सुमारास किनार्यावर परत आल्या. वार्यामुळे काही जाळी फाटली असून बोटींनादेखील हानी पोहोचली आहे. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा दावा मच्छीमार बांधवांकडून केला जात आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आर्थिक संकट घोंघावू लागले आहे.
पश्चिम किनार्यावर पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी हा 1 ऑगस्टपर्यंत असतो, मात्र मत्स्य प्रजनन काळ पाहता मासेमारीसाठी 15 ऑगस्टला बहुतांशी बोटी निघाल्या. ज्यामुळे समुद्रात माशांचे प्रमाण अधिक दिसून आले व आर्थिक उलाढाल चांगली होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले होते. मात्र हवामानात झालेल्या बदलामुळे शनिवारी वादळाशी झुंज द्यावी लागली. मासेमारी जाळ्या, बोटींचे स्टेअरिंग व अन्य वस्तूंचे नुकसान सहन करावे लागले. बोटी किनार्यावर येताच घरातील सदस्य, कामगारांनी जाळ्या व सर्व साहित्य बोटींमधून बाहेर काढले. आता जाळी दुरुस्त करण्यासाठीचे काम सुरू केले जाणार आहे. वादळाचा इशारा असल्याने हवामान सुधारल्यावर पुन्हा मासेमारीसाठी बोटी प्रवास करणार आहेत.
यंदा माशांचे प्रमाण चांगले असल्याने पापलेट, मुशी, सुरमई, बोंबील, कोळंबी, वाघूळ, हलवा, घोळ, दाढा, रावस मासे मिळत आहेत, मात्र वादळामुळे पदरी निशारा पडली आहे.यंदा पापलेटचा साठा काही वर्षांपासून पापलेट दुर्मिळ झाले आहे. समुद्रातील या माशाचे प्रमाण कमी झाल्याने गेल्या हंगामात व्यवसायावर परिणामदेखील दिसून आला, परंतु यंदा मासेमारी करताना पापलेटचे मुबलक दर्शन समुद्रात झाले, परंतु हवामानामुळे मच्छीमारांना माघारी फिरावे लागल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मच्छीमार व्यावसायिक, खलाशी, कामगार यांच्या हाताला आलेले काम गेले आहे. एका बोटीवर कमीत कमी 14 कामगार काम करतात. यातील काही कामगारवर्ग हा परराज्यातून आलेला असतो. त्यांना अगोदर वेतनापोटी उसने पैसे दिलेले असतात. याव्यतिरिक्त बोटीवर मालक व अन्य सहकारीदेखील असतात, परंतु वादळामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.एका बोटीवर सुमारे 15 ते 16 खलाशी, कामगार असतात. रायगड जिल्ह्यातील सुमारे दोन हजार बोटींवरील 35 हजारांहून अधिक कामगारांना परतावे लागले. एका बोटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील मच्छीमारांचे कोट्यवधीमध्ये नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. पुढचे दोन दिवस हवामान कायम राहणार असल्याने त्याचा मासेमारी, उत्पन्नावर परिणाम झाला आहे.