फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव विजयी

| पोयनाड | क्रीडा प्रतिनिधी |

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रवींद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यात फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाने लावास क्रिकेट क्लब पनवेल संघावर विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या फायटर्स माणगाव संघाने 35.2 षटकांमध्ये सर्व गडी बाद 151 धावसंख्या उभारली. अष्टपैलू खेळाडू अजय जाधवने मधल्या फळीत सर्वाधिक 45 धावा काढल्या. ऋग्वेद जाधव व निल जाधव यांनी प्रत्येकी 15 धावांचे संघाला योगदान दिले. लावास संघाकडून वेध वयालने 4, अनुराग कुलकर्णी, हार्दिक जाधव, आयुष पाटील यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले.

प्रत्युत्तरात लावास पनवेल संघाचा डाव 29 व्या षटकांत 75 धावसंख्येवर संपला. वेध वयालने सर्वाधिक 13 धावा काढल्या. फायटर्स माणगाव संघाकडून पार्थ म्हस्केने 4, निधीश मेहता यांनी 3, तर तनिष्क टेमकर यांनी 2 फलंदाज बाद केले. फायटर्स माणगाव संघाने 76 धावांनी सामना जिंकला. अष्टपैलू खेळाडू अजय जाधवला सामनावीर, वेध वयाल स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, पार्थ म्हस्के इमॅर्जिंग प्लेअर, आकाश चौधरी व हार्दिक जाधव यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून झुंझारचे किशोर तावडे, सागर कांबळे, रोहित काळे, संकेश ढोले, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version