। नेरळ । प्रतिनिधी ।
घोड्याचे नंबर लावण्याच्या शुल्लक कारणावरून माथेरान प्रवेशद्वार दस्तुरी येथे घोडेवाल्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या मारामारीत काठ्या, दगड यांचा वापर करण्यात आल्याने ऐन पर्यटन हंगामात प्रवेशद्वारातच हाणामारी झाल्यामुळे पर्यटक भीतीच्या छायेत दिसले. माथेरान हे वाहनांना बंदी असलेले पर्यटन स्थळ असून तेथे येणार्या पर्यटकाना माथेरान शहरात सोडण्यासाठी येथे घोडे उपलब्ध असतात. सर्व घोडेवाले नंबर लावण्यासाठी चांगभले मंदिर शेजारी उभे होते. तिथेच घोड्याचा नंबर लावण्यावरून आपापसात शिवीगाळ सुरू झाली. शिविगाळ सुरू असताना बाकीचे घोडेवाले एकमेकांच्या मदतीला येऊ लागले. याचे पर्यावसान मारामारीत झाले. भेटेल ती वस्तू हत्यार रुपात घोडेवाले वापरू लागले. यामध्ये दगड, घोड्याला मारणारी काठी याचा उपयोग करण्यात आला. येथे नवीनच आलेल्या पर्यटकांना काय करावे सुचेना, पर्यटकही जिकडेतिकडे सैरावैर पळू लागले. घोडेवाले एकमेकांवर दगड टाकत होते. त्यातील सुरेश आखाडे याच्या डोळ्यावर, गणेश शिंगाडे याच्या डोक्यावर व किरण आखाडे याच्या पायावर दगड मारून दुखापत केली.तर दुसर्या टोळीतील नरेश आखाडे याच्या डोक्यास, लक्ष्मण आखाडे यांच्या पायावर दुखापत झाली.
काही काळ लोटल्यानंतर पुन्हा एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा हाणामारी सुरू झाली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला. पोलिसांनी काही घोडेवाल्यांची धरपकड करून दोन्ही टोळ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक फौजदार केतन सांगळे करत आहेत.







