कांदळवन कत्तली प्रकरणी करंजा टर्मिनल लॉजिस्टिक कंपनीवर गुन्हा दाखल करा

। चिरनेर । वार्ताहर ।
येथील करंजा टर्मिनल लॉजिस्टिकने त्यांच्या बंदरालगतच्या खारफुटीची मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील कोप्रोली मच्छीमार सहकारी संस्थेचे सदस्य व उरण सामाजिक संस्थेने नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
उरण तालुक्यातील करंजा-कासवले खाडीत मुंबई मेरिटाईम बोर्डाच्या जागेवर खासगी करंजा टर्मिनल लॉजिस्टिक बंदराची उभारण्यात येत आहे. 2009 साली 30 वर्षांसाठी भुईभाड्याने घेऊन उभारण्यात येत असलेल्या खासगी करंजा टर्मिनल लॉजिस्टिक बंदरात करंजा इन्फ्रास्टक्चर प्रा.लि., स्कील इन्फ्रास्टक्चर लि., निखिल गांधी, जिगर शहा, दिनेश चौधरी, जय मेहता, अरविंद गुप्ता आदि बडे भांडवलदार भागधारक आहेत. मागील 11 वर्षांपासून या खासगी करंजा टर्मिनल लॉजिस्टिक बंदराच्या उभारणीचे काम सुरू आहे. या कंटेनर टर्मिनलच्या बंदर उभारणीमुळे याआधीच मच्छीमारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. खासगी करंजा टर्मिनल लॉजिस्टिक बंदराच्या उभारणीसाठी खारफुटी, कांदळवनाची मोठ्या प्रमाणावर बेसुमार आणि बेकायदेशीर कत्तल केली जात आहे.
त्यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यात मासळी ऐवजी खारफुटीचीच झाडे अडकून पडत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या गंभीर प्रकारामुळे स्थानिक मच्छीमारांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. तसेच बंदरात साठवलेल्या कोळशाच्या ढिगार्‍यातून काळे पाणी झिरपून समुद्रात सोडले जात आहे असेही निदर्शनास आले होते. मात्र त्यानंतरही खासगी करंजा टर्मिनल लॉजिस्टिक बंदरावर कारवाई करण्यात संबंधित शासकीय विभागाकडून दिरंगाई केली जात आहे. वस्तुत: करंजा टर्मिनल विरोधात लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे कंपनीच्या नावावर गुन्हा नोंदवणे आवश्यक होते. मात्र गुन्हा अज्ञात व्यक्तीवर करण्यात आला आहे. त्यामुळे कोण कुणाची पाठराखण करत आहे याचा उलगडा होत नसल्याचा गंभीर आरोप उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी केला आहे.
याप्रकरणी कोप्रोली मच्छीमार संस्थेचे सदस्य राजकिरण पाटील, गोकुळ पाटील, प्रकाश कोळी, विजय पाटील, सुनील कोळी यांनी बेसुमार कांदळवन कत्तली प्रकरणी करंजा टर्मिनल लॉजिस्टिक कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नवीमुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

Exit mobile version