| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
रेशनिंग दुकानाला प्राधिकार पत्र नसताना देखील कोप्रोली येथे रेशन दुकान सुरू होते. या प्रकरणी दुकान चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक आदित्य अशोक जानोरकर यांनी तहसीलदार पनवेल यांच्याकडे 28 नोव्हेंबर रोजी केली.
पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथे प्राधिकार पत्र नसतानादेखील रेशनिंग दुकान चालवले जात होते. गेल्या कित्येक वर्षांपासून हा गैरप्रकार सुरू होता. तसेच या ठिकाणी तक्रार वही, धान्य नोंद तसेच इतर गोष्टी नव्हत्या. व दुकान देखील वेळेत उघडत नव्हते. प्राधिकार पत्र नसताना हे रेशनिंग दुकान सुरूच कसे राहिले असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. याला पुरवठा अधिकाऱ्यांचे वरदहस्त होता. आजी-माजी पुरवठा अधिकाऱ्यांनी या दुकानाची कधी पाहणी केली नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर हे दुकान 2024 मध्ये बंद करण्यात आले. मात्र, या दुकान चालकावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. 2024 मध्ये हे दुकान बंद केल्यानंतर अद्याप देखील यावफ कारवाई झालेली नाही. त्यामुळे तहसीलदार मीनल भोसले यांच्याकडे या दुकानदारावर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आदित्य जानोरकर यांनी पत्राद्वारे केली. यावेळी माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार यांनी सांगितले असल्याची माहिती जानोरकर यांनी दिली.







