सिडको कार्यालयातून संचिका चोरीला

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| चिरनेर | प्रतिनिधी |

सिडको कार्यालयातील के-66 ही महत्त्वाची संचिका चोरीला गेल्याप्रकरणी राज्य माहिती आयोग, कोकण खंडपीठ, नवी मुंबई यांनी सीबीडी पोलिसांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दोन महिने उलटूनही संबंधित आरोपीचा शोध लागलेला नसल्याने अरुण मुंबईकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईकर यांच्या पत्नी कमल अरुण मुंबईकर यांचे वडील कै. बाळकृष्ण काळू भोईर यांच्या साडेबारा टक्के गावठाण विस्तार भूखंड योजनेशी संबंधित ही संचिका असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य माहिती आयोगाच्या 15 एप्रिल 2026 च्या आदेशानंतर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 16 एप्रिल 2026 रोजी सीबीडी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल वैभव गजानन पाटील यांच्याकडे अरुण मुंबईकर यांनी जबाब नोंदविला होता. मात्र, अद्याप संचिका गहाळ करणारा संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी सापडलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. कै. बाळकृष्ण काळू भोईर यांची जमीन 1970 मध्ये सिडकोसाठी भूसंपादित झाली होती. शासन नियमानुसार अधिक भूखंड मिळणे अपेक्षित असताना केवळ 199.99 चौ.मी.चा भूखंड देण्यात आल्याचा दावा करत उर्वरित भूखंडाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संचिका चोरीमागे भूखंड प्रकरणातील गैरव्यवहार असू शकतो, असा संशयही मुंबईकर यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक असलेल्या अरुण मुंबईकर यांनी संबंधित सिडको अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून, चोरीला गेलेल्या संचिकेचा तातडीने शोध लावावा, अशी विनंती सीबीडी पोलिसांकडे केली आहे.

Exit mobile version