अवैधरित्या वाळूउपसा प्रकरणी गुन्हे दाखल

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
मालवण तालुक्यातील काळसे येथील कर्ली नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा केल्याप्रकरणी सुमारे 40 ते 50 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील सहा जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनधिकृत वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. होड्यांच्या सहाय्याने शासकीय क्षेत्रातील वाळूची चोरीचा गुन्हा संबंधितांवर दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. मात्र महसूल विभागाकडून संबंधितांवर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काळसे बागवाडीमध्येही अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याने ग्रामस्थांनी महसूल आणि पोलीस विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.
यानुसार पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, आर. बी. पाटील, रुक्मांगद मुंडे, सुहास पांचाळ यांच्यासह नायब तहसीलदार आनंद मालवणकर, मंडळ निरीक्षक शिंगरे, कोतवाल स्वप्नील पालकर आदींच्या पथकाने काल सायंकाळी काळसे बागवाडीत अनधिकृत वाळू उत्खनन केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.
शिवाय, या गुन्ह्यात आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.

Exit mobile version