दोन ठिकाणी महसूल विभागाची कारवाई
। महाड । प्रतिनिधी ।
वाळू उपसा करण्यासाठी कोणताही परवाना नसताना महाड तालुक्यात बेकायदेशीर सेक्शन पंपाचा वापर करून वाळू उपसा केला जात असल्याने वाळू उपसा कारवाईने स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील जुई आणि टोळ या गावातून ही कारवाई करण्यात आली.
मागील आठवड्यात सावित्री नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा करणार्या सहा जणांवर महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत वाळू उपसा करणार्यांकडून एक होडी व वाळू असा 5 लाख 6 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
महाड तालुक्यात खाडीपट्टा विभागात असलेल्या सावित्री नदी किनारी जूई बुद्रुक या गावामध्ये शैक्षणिक पंपाचा वापर करून वाळू उपसा केला जात असल्याची माहिती महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांना मिळाली होती. त्यांनी नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, जुईचे तलाठी ऋषिकेश भोसले व इतर कर्मचार्यांच्या उपस्थित या ठिकाणी छापा टाकला. त्याच प्रमाणे तालुक्यातील टोळ गावात देखील महाड महसूल कर्मचार्यांनी छापा टाकत अनधिकृत वाळू उत्खनन करणार्यांना कारवाईचा दणका दाखवला आहे. मुनीब सरखोत आणि इतर पाच ते सहा जणांवर भादवी कलम 379, 34 आणि गौण खनिज उत्खनन कलम 21, 21(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महसूल विभागाने जुई येथून सहा ब्रास वाळूची वाहतुक करणारी पाच लाख रुपये किंमतीची होडी आणि 1 ब्रास वाळू असा 5 लाख 6 हजार बत्तीस रुपयांचा माल ताब्यात घेतला आहे. तर टोळ येथून 5 लाख 52 हजार 987 रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत जुई येथील तलाठी ऋषिकेश भोसले यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.