| महाड | प्रतिनिधी |
हरियाणातील रोहतक येथील 13 व्या स्टुडंट्स ऑलिम्पिक नॅशनल गेम्स 2026 चा भव्य आणि उत्साही वातावरणात शानदार समारोप झाला. या राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या कुस्ती स्पर्धेत महाडच्या बालकुस्तीपटूंनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या व शारीरिक क्षमतेच्या जोरावर तब्बल 21 पदके पटकावून राष्ट्रीय क्रीडा पटलावर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले.
या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, आसाम, कर्नाटक, मणिपूर आणि राजस्थान अशा 10 राज्यांतील सुमारे 350 गुणवंत खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. देशभरातून आलेल्या खेळाडूंमध्ये क्रीडांगणावर अत्यंत चुरशीच्या आणि कडव्या लढती पाहायला मिळाल्या. या कठीण
स्पर्धेत महाड येथील हिरवळ एज्युकेशन ट्रस्टची गुरुकुल अकादमी आणि सुभाष चंद्रकांत निकम एज्युकेशन संस्थेची ट्विंकल स्टार्स इंग्लिश मीडियम शाळा यांच्या कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी करत 7 सुवर्ण, 5 रौप्य आणि 9 कांस्यपदकांची लयलूट केली. सोहळ्यासाठी स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बी. डी. वानर आणि सरचिटणीस डॉ. प्रदीप भारद्वाज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. असोसिएशनचे राज्य सचिव सुनील शिंदे, रायगड जिल्ह्याचे सचिव डॉ. महादेव शिंदे व सोलापूरचे सचिव नागेश शेट्टीकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
राज्यातील 350 नामांकित खेळाडूंच्या कडव्या आव्हानाला तोंड देत महाडच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अत्यंत ऐतिहासिक आहे. मुलांचे कठीण परिश्रम, नियमित सराव आणि जिद्दीच्या जोरावरच राष्ट्रीय व्यासपीठावर 21 पदकांची लयलूट करणे शक्य झाले. हा विजय केवळ शाळेचा नसून संपूर्ण महाड तालुका आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.
विठ्ठल नातेकर
(प्रशिक्षक)







