। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
युएनडीपी, वनविभाग आणि कांदळवन कक्ष यांच्यासह विविध संस्थांच्या माध्यमातून गेल्या पाच-सहा वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाच्या कामाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रकल्पातर्गंत मत्स्यपालनातून 126 गटांच्या 1010 लाभार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. कांदळवन संवर्धनाच्या दृष्टीने जिल्ह्यात झालेला हा खूप मोठा सकारात्मक बदल म्हणता येईल.
धुप थांबविण्यासाठी कांदळवनाचा मोठा फायदा होतो; परंतु याच कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धनाचा मुद्दा काही वर्षापुर्वी पुढे आला होता. त्यामुळे ही कांदळवने टिकविण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले. शासनाच्या युएनडीपी आणि एमपीईडीए, कांदळवन कक्ष, वनविभाग यांना स्थानिक लोकांच्या सहकार्यानेच कांदळवन संवर्धन शक्य असल्याची खात्री पटल्यामुळे या प्रकल्पांतर्गंत कांदळवन परिसरातील महिला बचत गटांसाठी प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली. कांदळवन क्षेत्रात महिला बचत गटांना खेकडा पालन, कालवे पालन, शिणाने पालन, शोभिवंत मत्स्यपालन असे प्रकल्प 90 टक्के अनुदानावर सुरू केले. या प्रकल्पांतर्गत महिला बचत गटांच्या महिलांना केरळ, तामिळनाडु, आंध्रप्रदेश येथे नेऊन प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेऊन आलेल्या महिलांपैकी काहींनी खेकडा पालन, काही गटांनी कालवे, शिपंले पालन सुरू केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरच महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 110 महिला बचत गट हे प्रकल्प सुरू केले असून त्यातून लाखो रूपयांची उलाढाल दरवर्षी होते. उत्पादीत मत्स्यउत्पादनाला स्थानिक आणि गोवा बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या प्रकल्पातर्गंत 41 कांदळवन सहव्यवस्थापन समित्या गठित करण्यात आल्या. या समित्यांच्या माध्यमातून कांदळवन सरंक्षित झाली आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे 40 हेक्टरवर कांदळवन वृक्षांची लागवड झाली आहे.