समाजमंदिराच्या जागेवरून गुन्हा दाखल

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील खांडस येथील सामाजिक सभागृहाच्या जागेवरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर तेथे कुंपण टाकण्याच्या वादातून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या प्रकरणात बौद्ध धर्मीय लोकांना जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजे खांडस येथील बौद्धवाडा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे जागेवरुन वाद झाला. तेथील जमीन खरेदी केलेल्या हिंदू व्यक्तीने खरेदी केलेल्या जागेबरोबर बाजूच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर या नियोजित सभागृहाच्या जागेत अतिक्रमण करून कुंपण घातले. त्याबद्दल वाद झाला आणि त्यात दाद मागणारे हे बौद्धसमाजाचे आहेत हे माहिती असताना देखील चार आरोपी यांनी आपसात संगनमत करुन फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडक्याने तसेच हाताबुक्याने मारहाण करुन दुखापत केली. तसचे त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल झाल्यानंतर कर्जत पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version