| नेरळ | वार्ताहर |
शेलू गावातील एका जागेमध्ये बांधकाम करण्यावरून झालेल्या या वादानंतर नेरळ पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 15 ऑक्टोबर रोजी नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या शेलू गावात घडली असून, कुंडलिक नागो वाघ यांनी ही तक्रार दाखल केली. कर्जत तालुक्यात येत असलेल्या नेरळ शेलू येथील साईबाबा मंदिर आधारवाडी कातकरवाडी येथे राहणारे कुंडलिक नागो वाघ यांच्या घरासमोर असणार्या मोकळ्या जागेत गावात राहणारे विलास डुकरे, तुषार डुकरे, जयेश डुकरे आणि बळीराम डुकरे यांनी टिकाव व फावडे घेऊन त्या जागेत बांधकाम करण्यासाठी गेले होते. यावेळी तक्रारदार कुंडलिक नागो वाघ व त्यांच्या घरातील आई आणि बहीण यांनी विचारणा केली असता डुकरे यांनी त्यावेळी कुंडलिक यांना जातीवाचक शिवीगाळ करीत त्यांना धक्काबुक्की केली. तर आई आणि बहीण हे पुढे गेले असता त्यांनासुद्धा डुकरे यांनी धक्काबुक्की केली. यावेळी वाद वाढू नये म्हणून कुंडलिक नागो वाघ यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. तक्रारदार कुंडलिक नागो वाघ हे आदिवासी कातकरी समाजाचे असून, आरोप करण्यात आलेले डुकरे हे शेलू गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असून, ते आगरी समाजात येत आहेत. या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर केला जात आहे.