मावळमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

| उरण | वार्ताहर |

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि.18) भरण्यास प्रारंभ होत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खा. श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. बारणे हे 22 एप्रिल रोजी, तर वाघेरे हे 23 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघ हा पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत या मतदारसंघाचा समावेश आहे. यंदा पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक उमेदवारांमध्ये आणि दोन्ही शिवसेनेत लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आहे. 18 ते 25 एप्रिल या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. 26 एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 29 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर, 13 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय कार्यालय आकुर्डीतील पीएमआरडीए कार्यालयाच्या सातव्या मजल्यावर आहे.

Exit mobile version