माथेरानमध्ये खड्डे भरण्यास सुरुवात

। माथेरान । वार्ताहर ।

एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते. परंतु, त्यातील काही निकृष्ट दर्जाच्या ब्लॉकमुळे रस्त्याला जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक पर्यटक पडून जखमी झाले आहेत. तसेच, याच रस्त्यावरून वाहतूक करणार्‍यांनासुध्दा त्रासदायक बनले होते. यासंदर्भात राकेश कोकळे माथेरानच्या मुख्याधिकार्‍यांकडे वारंवार पाठपुरावा करत होते. अखेरीस त्यांच्या निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी या रस्त्यावर नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांमार्फत माती आणि खडीने खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

तसेच, माथेरानमध्ये विकास कामे होत असताना ती कशा पद्धतीने पूर्ण केली जात आहेत, ठेकेदार कामाला दर्जा देत आहे की नाही, याबाबत नागरिकांनीसुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे. अनेकदा ठेकेदार कामांमध्ये चालढकल करत असतात कामे लवकरच आटोपून बिले काढण्याची घाई असल्यामुळे कामे तकलादू होत असतात. यासाठी नागरिकांनी होत असलेल्या कामांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे राकेश कोकळे यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version