माणगावात रिक्त पदांचा बोजवारा

। माणगाव । प्रतिनिधी ।
नागरिकांसाठी लोककल्याणाच्या योजना राबविण्यासाठी सरकार प्रयत्न करित आहे. मात्र या विविध योजना व सरकारी कामकाज चालवणारी यंत्रणा सक्षम नसेल तर त्या योजना तळागाळात कशा पोहोचणार ? हा सवाल नागरीकातून उपस्थित होत असून माणगाव तालुक्यात विविध खात्यातील कार्यालयात अनेक रिक्त पदे असून या रिक्त पदाचा अतिरिक्त कारभार पर्यायाने त्याच कार्यालयातील इतर कर्मचार्‍यावर सोपवून अधिकारी मोकळे होतात. मात्र या रिक्त पदामुळे नागरिकांची कुचंबना होत असून आपल्या कामासाठी नागरिक शासन दरबारी खेटे मारत आहेत.


माणगाव तालुक्यात तालुका कृषी अधिकारी हे पद 13 ऑगस्ट 2022 पासून रिक्त असून त्या पदावर तालुका कृषी अधिकारी वर्ग 2 चा कारभार म्हणून प्रभारी तालुका कृषी अधिकार्‍याची नियुक्ती आहे. कनिष्ठ कृषी अधिकारी वर्ग 2 ची 2 पदे रिक्त आहेत. कृषी सहाय्यक 5 पदे, शिपाई 2 पदे, सहाय्यक अधीक्षक 1 पद, कनिष्ठ लिपिक 1 पद तर माणगाव उपविभागीय कार्यालया अंतर्गत तलाठी 5 पदे रिक्त आहेत. शिपाई रोहा, माणगाव, तळा, सुधागड या तालुक्यातील 6 पदे रिक्त आहेत, कोतवाल 4 पदे रिक्त तर माणगाव तालुक्यात पोलीस पाटलाची 101 पदे रिक्त आहेत. तसेच माणगाव तहसिल कार्यालयात महसूल सहाय्यक 6 पदे, मंडळ अधिकारी 1 पद, शिपाई 1 पद, स्वच्छक 1 पद, कोतवाल 6 पद, तलाठी 5 पदे हि पदे रिक्त आहेत. पंचायत समितीमध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी 1 पद, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा 1 पद, वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती 2 पद, कनिष्ठ सहाय्यक 7 पदे, वाहन चालक 8 पदे, शिपाई 10 पदे, विस्तार अधिकारी संख्येकी (आय.सी.डी.एस) 1 पद, सहाय्यक लेखाधिकारी 1 पद, कनिष्ठ लेखाधिकारी 1 पद, ग्रामसेवक 12 पदे रिक्त आहेत.
माणगाव तालुक्यातील पोलीस ठाणे, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख याही कार्यालयात अनेक महत्वाची पदे रिक्त असून हि पदे शासन कधी भरणार असा सवाल नागरीकातून उपस्थित होत असून माणगाव तालुक्यात विविध कामासाठी ग्रामीण भागातून व अन्य ठिकाणाहून नागरिक आपली कामे करण्यासाठी नागरिक येत असतात. या रिक्त पदाच्या कर्मचार्‍याची कामे त्याच कार्यालयातील अन्य कर्मचार्‍यावर सोपवली जात असून त्या कर्मचार्‍यावर आपल्याकडील असणारी कामे अधिक अतिरिक्त येणारी कामे वाढत असल्याने या कर्मचार्‍यावर कामाचा बोजा वाढत आहे. शासनाचे विविध योजना राबविणारी यंत्रणाच कुचकामी असेल तर लोकाभिमुख प्रशासन कसे चालणार असा सवाल उपस्थित होत असून शासनांनी हि रिक्त पदे त्वरित भरवित अशी मागणी नागरीकातून होत आहे.

Exit mobile version