| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी (दि.1) जूनला मतदान होणार आहे. (दि.1) जूनला मतदान झाल्यानंतर (दि. 4) जूनला निकाल लागेल. त्यामुळे सगळ्याचं पक्षांची धाकधूक आता वाढली आहे. देशातील 7 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मिळून 57 जागांसाठी मतदान होईल. या मतदानात 904 उमेदवारांचा फैसला होणार आहे. या जागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसीचाही समावेश आहे. अंतिम टप्प्यात एकूण 904 उमेदवारांचे भवितव्य ठरेल.
अखेरच्या टप्प्यात पंजाबमधील सर्व 13 जागांसाठी तसेच चंदिगढमधील एकमेव जागेसाठी मतदान होईल. त्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8 आणि ओडिशातील 6 जागांसाठी मतदार त्यांचा कौल देतील. त्याशिवाय, हिमाचल प्रदेशातील सर्व 4 जागांसाठी आणि झारखंडमधील 3 जागांसाठीही मतदान होणार आहे. त्या मतदानामुळे मतदारांच्या कौलाची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष 4 जूनला जाहीर होणार्या निकालाकडे लागेल.
निवडणूक आयोगाने 16 मार्चला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे प्रचारासाठी 75 दिवसांचा प्रदीर्घ कालावधी उपलब्ध झाला. साहजिकच, प्रमुख राजकीय पक्षांना मॅरेथॉन प्रचार मोहिमा राबवण्याची संधी मिळाली. सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांनी झंझावाती दौरे करत प्रचाराचा धुरळा उडवून दिला. यावेळच्या निवडणुकीला भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ एनडीए विरूद्ध विरोधकांची इंडिया आघाडी अशा लढतीचे स्वरूप प्राप्त झाले. आतापर्यंत झालेल्या सर्व 6 टप्प्यातच 62 टक्क्यांच्या वरच मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 66.14% मतदान झालं, दुसर्या टप्प्यात 66.71 %, तिसर्या टप्प्यात 65.68 % मतदान झालं, चौथ्या टप्प्यात 69.16 %, पाचव्या टप्प्यात 62.02 %, तर सहाव्या टप्प्यात 63.37% मतदानाची नोंद झाली आहे.