अखेर बाबारसेनेला व्हिसा मिळाला

पाकिस्तान संघ बुधवारी येणार भारतात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंना एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय व्हिसा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याबाबतची माहिती दिली. पाकिस्तानशिवाय आफगाणिस्तानच्या चमूलाही व्हिसा मिळाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) टीमला हैदराबादला जाण्यास उशीर होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली. त्यानंतर काही तासांतच आयसीसीने व्हिसा जारी केल्याची माहिती दिली.

2016 टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ शेवटचा भारतात आला होता. दोन देशांमधील राजकीय तणावामुळे क्रिकेट संघ फक्त आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. आता पाच ऑक्टोबरपासून होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतात येत आहे. 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान याच्यात लढत होणार आहे.

पाकिस्तानचा संघ उद्या, 27 सप्टेंबर रोजी भारतासाठी रवाना होणार आहे. पाकिस्तान संघाच्या नियोजित प्रवासापूर्वी 48 तास आधीच व्हिसा मिळाला आहे. पाकिस्तान संघ 29 सप्टेंबरला हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. विश्वकरंडकासारखी मोठी स्पर्धा असताना व्हिसासाठी अशा प्रकारचा अतिविलंब चिंता करणारा आहे, अशी नाराजी पाक क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते उमर फारुक यांनी व्यक्त केली.

Exit mobile version