तीस वर्षातील खड्ड्यांच्या त्रासातून अखेर सुटका

काँक्रिटीकरण कामाला वेग

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

खालापुर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा अशी असून या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असाच त्रास माणकिवली ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली-शेणगाव परीसरामधील प्रवासी व रहिवाशांना करावा लागत होता. गेल्या अनेक वर्षांपासून येथील मुख्य रस्ता खड्ड्याच्या विळख्यात सापडल्याने अनेक जण खड्ड्याच्या त्रासाला अक्षरशः कंटाळले होते. आता हा खड्डेमय रस्ता काँक्रिटीकरण झाल्याने पुढील काळात येथील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार असून काँक्रिटीकरण काम अत्यंत चांगल्या दर्जाचे होत असल्याने अनेक जण समाधान व्यक्त करत आहेत.

आमच्या गावचा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्याच्या विळख्यात सापडला होता. त्यामुळे इथून प्रवास करणे आम्हाला जिकरीचे बनले होते. आता या रस्त्याचे काँक्रीट करण्याचे काम सुरू आहे. तर, काही अंतराचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्णत्वास गेल्याने समाधान व्यक्त करत आहोत. हे काम उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी आम्ही वेळोवेळी दक्षता घेत आहोत.

विष्णू ठोंबरे, माणकिवली ग्रामस्थ

माणकिवली रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाने वेग घेतल्याने पुढील काळात माणकिवलीसह शेणगाव परिसरातील ग्रामस्थांसह प्रवाशांचा येथून प्रवास सुखकर होणार असून अनेक वर्ष खड्ड्यातून होणारा प्रवास आता खड्डे मुक्त होणार आहे. त्यामुळे सर्वजण समाधान व्यक्त करत आहेत.

चंदन भारती, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य
Exit mobile version